Saturday, October 17, 2026

Thane News: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, गरबा आणि रास दांडिया खेळण्यासाठी वेळेमध्ये केली वाढ; जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

Thane News: नवरात्रीचे सध्या शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ठाणे जिल्हा प्रशासनाने गरबाप्रेमी आणि रास दांडियाप्रेमींसाठी वेळेमध्ये वाढ केली आहे.

ठाणे: गरबा आणि रास दांडियाप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवरात्रीचे सध्या शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ठाणे जिल्हा प्रशासनाने गरबाप्रेमी आणि रास दांडियाप्रेमींसाठी वेळेमध्ये वाढ केली आहे. नवरात्रीचे उरलेले शेवटचे तीन दिवस मध्यरात्री 12 दिवस ध्वनिक्षेपकासह वाजवण्यासाठी नागरिकांना आणि गरबा आयोजकांना आता परवानगी दिली आहे. खरं तर, सरकारने नवरात्रीच्या दिवसांमध्ये गरबा आयोजकांना रात्री 10 वाजेपर्यंतच ध्वनिक्षेपक वाजवण्यासाठी परवानगी दिली होती. पण नवरात्रीच्या शेवटच्या काही दिवसांमध्येच ठाणे जिल्हा प्रशासनाने वेळेमध्ये वाढ करण्याची मंजुरी दिली आहे.

ठाणे जिल्ह्यातील नवरात्रौत्सवाचा उत्साह लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी आणि गरबा आयोजकांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी नवरात्रोत्सवानिमित्त सलग तीन दिवस म्हणजेच 17 ऑक्टोबर, 18 ऑक्टोबर आणि 19 ऑक्टोबर असे तीन दिवस सकाळी 6 ते रात्री उशिरा 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक (लाऊडस्पीकर) वापरण्यास मंजुरी दिली आहे. ध्वनी प्रदूषण नियम, 2000 नुसार एका वर्षात एकूण 15 दिवस सणांसारख्या विशेष प्रसंगी रात्री 10 ते 12 या वेळेत ध्वनिक्षेपक वापरासाठी दोन तासांची अतिरिक्त सूट देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराप्रमाणे, 17 ऑक्टोबर (शनिवार) आणि 19 ऑक्टोबर (सोमवार) या दोन दिवसांसाठी रात्री 12 वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आली होती. मात्र, ठाणे जिल्ह्यात नवरात्रौत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याने आयोजक आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत मध्यंतरीचा दिवस म्हणजेच 18 ऑक्टोबर (रविवार) या दिवशीही रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे आता शनिवारी, रविवारी आणि सोमवारी अशा सलग तीन दिवशी ठाणेकरांना रात्री 12 वाजेपर्यंत नवरात्रौत्सवाचा आनंद लुटता येणार आहे. जिल्हाधिकारी निर्णय देताना जिल्हा प्रशासनाने काही महत्त्वाच्या अटी व शर्ती देखील लागू केल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली ही सवलत केवळ वापराच्या वेळेपुरतीच मर्यादा वाढवून देण्यासाठी असून ध्वनीच्या आवाजाची मर्यादा (डेसिबल पातळी) सर्व नियमांनुसार पाळणे अनिवार्य राहिल. तसेच उत्सव आयोजकांनी ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी संबंधित स्थानिक पोलीस व सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या परिसरांमध्ये ध्वनिक्षेपकासंबंधी लागू असणारे नियम व निर्बंध पाळावे लागतील आणि रात्री 12 वाजता ध्वनिवर्धक पूर्णपणे बंद करावे लागतील. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस यंत्रणेला देण्यात आले आहेत. नियमांचे काटेकोर पालन करत सर्व नागरिकांनी अत्यंत उत्साहात आणि आनंदात उत्सव साजरा करावा, असे आवाहन ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा