मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील नागरिकांना आग, इमारत कोसळणे, अपघात, झाडे उन्मळून पडणे, पाण्यात बुडण्याच्या घटना तसेच अन्य आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने १०१ या आपत्कालीन दूरध्वनी क्रमांकासह पाच पर्यायी भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. दूरध्वनी सेवेतील संभाव्य तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन मदतकार्यात अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने ही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले पर्यायी भ्रमणध्वनी क्रमांक ९०७६३३३१०१, ९०७६३३३१०२, ९०७६३३३१०३, ९०७६३३३१०४ आणि ९०७६३३३१०५ याप्रमाणे आहेत.
मुंबई अग्निशमन दलाचा १०१ हा आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरीही, या सेवेतील वारंवार उद्भवणारे तांत्रिक बिघाड आणि दुरुस्तीसाठी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे सेवा खंडित होण्याची शक्यता असते. अशा वेळी नागरिकांना अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात अडचण येऊ नये आणि आपत्कालीन सेवेला विलंब होऊ नये, यासाठी ही पर्यायी संपर्क व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. या पर्यायी भ्रमणध्वनी क्रमांकांचा वापर करून मुंबई अग्निशमन दलाशी संपर्क साधता साधावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुंबईच्या महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या शीव रेल्वे ...
अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षामध्ये १०१ च्या दूरध्वनी क्रमांकाशिवाय अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे इतर कामाकाजाकरिता १०१ च्या दूरध्वनी सेवेचा वापर करावा लागतो. परंतु कोणत्याही मोठ्या दुर्घटनेच्या वेळी १०१ क्रमांक निरंतर चालू राहिल्यास अन्य दुरध्वनी कामांच्या सेवेमध्ये खंड पडतो.
मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षात दरवर्षी १५ हजारांहून अधिक आपत्कालीन दूरध्वनी प्राप्त होतात. आगीच्या घटनांबरोबरच इमारत कोसळणे, वाहनांचे अपघात, प्राणी किंवा पक्षी अडकणे, समुद्रात अथवा तलावात व्यक्ती बुडणे, झाडे कोसळणे आणि रस्त्यावर तेल सांडणे अशा विविध घटनांमध्ये अग्निशमन दलामार्फत तातडीने प्रतिसाद दिला जातो. त्यामुळे आपत्कालीन संपर्क व्यवस्था अखंडित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुंबईतील नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे आगीपासून तसेच अन्य आपत्तींपासून संरक्षण करण्याची जबाबदारी मुंबई अग्निशमन दल पार पाडते. सध्या दलाची ३५ अग्निशमन केंद्रे, भायखळा येथे मुख्य नियंत्रण कक्ष, भायखळा, वडाळा, मरोळ, बोरिवली, मानखुर्द आणि विक्रोळी येथे सहा प्रादेशिक समादेश केंद्रे, १९ लघु अग्निशमन केंद्रे आणि २२ जलद प्रतिसाद वाहने कार्यरत आहेत.