मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुंबईच्या महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या शीव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल आणि गोरेगाव - मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता दृकश्राव्य (व्हर्च्युअल) पद्धतीने करण्यात येणार आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संबंधित उड्डाणपुलांच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, तसेच उपमहापौर संजय घाडी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.स्थानिक नगरसेवक शजगदीश मकुन्ननी थैईवालापिल, नगरसेविका साजिदा बाबू खान, नगरसेविका आशा काळे, नगरसेविका राजेश्री शिरवडकर, नगरसेवक धर्मेश गिरी, नगरसेविका प्रीती सातम हेही यावेळी उपस्थित असतील.
शीव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाची संक्षिप्त माहिती
मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प अंतर्गत मध्य रेल्वे मार्फत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) - कुर्ला दरम्यान दोन अतिरिक्त रेल्वे मार्गिका (५ वी व ६वी) टाकण्याचे नियोजित आहे. या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी शीव स्थानकाजवळच्या रेल्वेवरील पुलाची पुनर्बांधणी काम रेल्वेच्या आवश्यकतेनुसार हाती घेण्यात आले. तसेच, ११२ वर्षे जुना पूल असुरक्षित ठरविण्यात आल्याने पुलाची पुनर्बांधणी करणे आवश्यक झाले.
हा पूल पश्चिम बाजूच्या धारावी, वांद्रे, वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला तसेच पूर्वबाजूच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व पुर्व द्रुतगती मार्ग यांना जोडणारा महत्त्वाचा पूर्व - पश्चिम दुवा आहे. पुलाची पुनर्बांधणी झाल्यामुळे अत्यंत वर्दळीचा जोडमार्ग सुरक्षितरित्या पुनर्स्थापित होणार आहे. या पुलाचे काम हे फेब्रुवारी २०२७ मध्ये पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, या पुलाच्या कामात, उपयोगिता वाहिन्या, जलवाहिन्या यांचे स्थानांतर करणे, बाधित वृक्ष, सार्वजनिक स्वछतागृहांचे स्थानांतर व पुनर्बांधणी अशा अडचणी असून देखील पुलाचे काम चार महिने अगोदर पूर्ण करण्यात आले आहे.
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या 500 कोटींच्या आरोपांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी खंडन केले. “मी कोणालाही 500 कोटी ...
विद्याविहार पूर्व व पश्चिम यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाची संक्षिप्त माहिती
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागाच्या हद्दीत, घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या रुळांवरून जाणारा उड्डाणपूल महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या वतीने उभारण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांवरून १० मिनिटांपर्यंत कमी होणार असून घाटकोपर स्थानकाजवळील उड्डाणपुलावरील वाहतूकही कमी होणार आहे.
गोरेगाव - मुलुंड जोड मार्गवरील उड्डाणपूल प्रकल्पाची संक्षिप्त माहिती
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पूर्व द्रुतगती महामार्गाची पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडणी करून पूर्व व पश्चिम उपनगरांदरम्यानची वाहतूक अधिक सुलभ व सुरळीत करणे हा आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. 0 अंतर्गत गोरेगाव पूर्व येथील रत्नागिरी हॉटेलजवळील जंक्शनवर १.२६ किलोमीटर लांबीचा ३ × ३ मार्गिकेचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. गोरेगाव (पूर्व) येथील, जनरल अरुणकुमार वैदय मार्ग ते दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील संतोष नगर पर्यंतच्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या उड्डाणपुलामुळे, गोरेगाव - मुलुंड जोडरस्त्यांतर्गत जुळ्या बोगद्यांद्वारे पूर्व व पश्चिम उपनगरांदरम्यान जोडणी तसेच जनरल अरुणकुमार वैदय मार्ग, दिंडोशी न्यायालय, हॉटेल रत्नागिरी जंक्शन, वालभट नदी चौक तसेच लगतच्या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.