Wednesday, October 21, 2026

नाशिक सिंहस्थ कुंभमेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिले ध्वजारोहणाचे अधिकृत आमंत्रण

नाशिक सिंहस्थ कुंभमेळा 2026 च्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना अधिकृत आमंत्रण दिले. या उच्चस्तरीय शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांचा समावेश होता.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक नगरी सज्ज झाली आहे. या सोहळ्याची सुरूवात येत्या 31 ऑक्टोबरपासून होणार आहे. पवित्र अशा कुंभमेळ्याला ध्वजारोहण सोहळ्यानंतर प्रारंभ होणार आहे. यासाठी नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्ता येथे ध्वजारोहण होणार आहे. या ध्वजारोहण सोहळ्याची सर्व तयारी झाली असून. या सोहोळ्याचं अधिकृत निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या या विशेष शिष्टमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या भेटीवेळी अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्यमंत्री नरहरी झिरवाळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा धर्मादाय सहआयुक्त न्यायमूर्ती विवेक सोनुणे, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे नरसिंहकृपा दास, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते.

या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना सन्मानपूर्वक नाशिक कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे निमंत्रण दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हे आमंत्रण अत्यंत आनंदाने स्वीकारले असून या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सोहळ्याला त्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याने नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचे वैभव अधिकच वाढणार आहे. दरम्यान, या भव्य सोहळ्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासन आणि कुंभमेळा प्राधिकरणाकडून जय्यत तयारी केली जात आहे.

पंचेंद्रियांना अनुभव देणारे कलात्मक निमंत्रण

  • राष्ट्रपतींना देण्यात आलेले निमंत्रण कलात्मक संकल्पनेवर आधारित असून, निमंत्रण पेटी उघडताच कुंभमेळ्याची पौराणिक पार्श्वभूमी, आध्यात्मिक महात्म्य आणि भव्यता दर्शविणारी त्रिमितीय (पॉप-अप) कलाकृती उलगडते. दृष्टी, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श या पंचेंद्रियांशी संबंधित अनुभवांचा समावेश या संकल्पनेत करण्यात आला आहे. त्यातून नाशिकचा सांस्कृतिक वारसा, पवित्र गोदावरीचा महिमा आणि भारतीय परंपरेतील कुंभमेळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
  • भेटवस्तू संचात आदिवासी विकास विभागांतर्गत शबरी नॅचरल्सच्या विविध उत्पादनांचा समावेश आहे. अगरबत्ती, भरडधान्यांपासून तयार केलेले खाद्यपदार्थ, मोहफुलांपासून बनविलेली उत्पादने, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू आणि वनमध यांचा त्यात समावेश आहे. या उत्पादनांतून आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान, नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर आणि स्थानिक उद्योजकतेचे सामर्थ्य अधोरेखित होते. आदिवासी कारागिरांचे कौशल्य, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आणि समुदायांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा संदेशही या माध्यमातून देण्यात आला आहे.

पैठणीचाही समावेश

महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचे प्रतीक असलेल्या येवला येथील पैठणीचाही भेटवस्तू संचात समावेश करण्यात आला आहे. नाशिकच्या कृषिसमृद्धीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काळ्या मनुका आणि काजू यांच्यासह नाशिकच्या खाद्यसंस्कृतीचे प्रतीक असलेला चिवडा, निवडक मिठाई आणि सुकामेव्याचे पदार्थही राष्ट्रपतींना भेट देण्यात आले. या संचातून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक महत्त्वासोबतच महाराष्ट्रातील विविध प्रदेशांच्या परंपरा, स्थानिक उत्पादने आणि सांस्कृतिक वैविध्याची ओळख करून देण्यात आली आहे.

  • कुंभमेळा प्रारंभ (ध्वजारोहण सोहळा): 31 ऑक्टोबर 2026 (रामकुंड, नाशिक आणि कुशावर्त, त्र्यंबकेश्वर येथे दुपारी 12:02 वाजता)
  • पहिले अमृतस्नान (शाही स्नान): 2 ऑगस्ट 2027
  • दुसरे अमृतस्नान (शाही स्नान): 31 ऑगस्ट 2027
  • तिसरे अमृतस्नान (शाही स्नान): नाशिक (रामकुंड) - 11 सप्टेंबर 2027 आणि त्र्यंबकेश्वर (कुशावर्त कुंड) 12 सप्टेंबर 2027
  • कुंभमेळा समाप्ती (सांगता सोहळा): 24 जुलै 2028

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी एकाच वेळी हा भव्य धर्मध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानंतरच सिंहस्थ कुंभमेळ्याला अधिकृतपणे सुरुवात होणार आहे. यंदाच्या सोहळ्यात सहा हजाराहून अधिक आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत महा गोदा आरती आणि भव्य शंखनाद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा