Wednesday, October 14, 2026

Nashik Kumbh Mela: कुंभमेळ्यात आखाड्यांचं महत्त्व काय? त्यांचं काम आणि त्या मागचं रहस्य काय? जाणून घ्या

Simhastha Kumbh Mela 2026: नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याला अवघ्या काही दिवसात सुरूवात होणार आहे. 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहण झाल्यानंतर कुंभमेळ्याला सुरूवात होईल. कुंभमेळा कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. कुंभमेळ्यात भाग घेणाऱ्या आखाड्यांचं महत्त्व आहे. चला जाणून घेऊयात या आखाड्यांबाबत..

आखाडा हा शब्द वाचला की पहिलं डोक्यात येते ती कुस्ती... कुस्तीसाठीच आखाडा हा शब्द प्रचलित आहे. मग कुंभमेळ्यात भाग घेणाऱ्या साधुसंताच्या संस्थांना आखाडा का संबोधलं जातं? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. आखाडा नाव देण्याचं कारणही तसंच आहे. धर्मासाठी लढण्यासाठी सदैव तयार असतात, त्यामुळेच साधुसंताच्या गटांना आखाडा असं म्हंटलं जातं. त्यामुळेच आखाडा शब्द येथे बरोबर बसतो. एका अर्थाने या आखाड्यांना हिंदू धर्माचे मठ असंही म्हणता येईल. सुरूवातीच्या काळात चार प्रमुख आखाडे होते. पण वैचारिक मतभेदामुळे त्यांची काळानुरूप विभागणी होत गेली आणि आज ही संख्या 13 झाली आहे. यात शैव, वैष्णव आणि उदासीन असं या आखाड्यांचं स्वरूप आहे.7 शैव, 3 वैष्णव आणि तीन उदासीन आखाडे आहेत. कुंभमेळा हा आखाड्यांचा मेळावा असतो, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. शाही मिरवणुका, रथ, सजवलेले हत्ती आणि घोडे, घंटा आणि ढोल, नाग आखाड्यांचे पराक्रम आणि अगदी तलवारींचे प्रदर्शन या निमित्ताने पाहायला मिळते.

आखाड्यांची स्थापना कोणी केली?

कुंभमेळ्याच्या निमित्ताने आखाडे आपल्या शिष्यांना परंपरेनुसार दीक्षा देतात आणि त्यांना पदव्या प्रदान करतात. हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आदि शंकराचार्य यांनी आखाड्यांची स्थापना केली होती, असं बोललं जातं. पण आखाड्यांच्या स्थापनेबाबत विविध कथा आणि दावे आहेत, त्यामुळे त्याची सुरूवात कशी झाली हे सांगणं कठीण आहे. शिवाची उपासना करणारे शैव आखाडे, विष्णूची उपासना करणारे वैष्णव आखाडे, तर तिसऱ्या आखाड्याला उदासीन आखाडा संबोधलं जातं. उदासीन आखाड्यातील साधुसंत गुरूनानक यांच्या वाणींने प्रेरित झालेले असून पंचतत्वाची उपासना करतात. भूमी, अग्नी, वायु, जल आणि आकाश या पंचतत्त्वांची पूजा करतात.

सर्वात मोठा आखाडा कोणता?

श्री पंचदशनाम जूना आखाडा हा शैव संप्रदायातील सर्वात मोठा आखाडा आहे. याची स्थापना उत्तराखंडच्या कर्णप्रयागमध्ये 1145 साली झाली होती. या आखाड्याचे इष्ट देव शिव आणि रुद्रावतार दत्तात्रेय आहे. या आखाड्याचं मुख्यालय वाराणसीत आहे. हा आखाडा नागा साधुंमुळे ओळखला जातो. या आखाड्यात नागा साधुंची संख्या सर्वाधिक आहे. जवळपास 5 लाख नागा साधु आणि महामंडळेश्वर संन्यासी आहेत. या आखाड्याचे आचार्य महामंडळेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज आणि आंतरराष्ट्रीय संरक्षक श्रीमहंत हरिगिरी आहेत. जुना आखाड्यांचा थाट राजा महाराजांसारखा असतो.

आखाडे आणि वाद!

आखाड्यांकडे हिंदू धर्माचे रक्षक म्हणून पाहिले जाते. पण अनेकदा आपआपसातच त्यांचे वाद झाले आहे. इतकंच काय तर त्याला हिंसक रूपही प्राप्त झाले आहे. कुठे तंबू लागेल इथपासून कोण पहिलं स्थान स्नान करणार यावरून वाद पाहायला मिळाले आहे. 1954 मध्ये आखाड्यांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर योग्य समन्वय राखण्यासाठी आखाडा परिषदेची स्थापना करण्यात आली. यात सर्व मान्यताप्राप्त आखाड्यांचे दोन दोन प्रतिनिती आहेत. आपआपसातील वाद सोडवण्यासाठी या प्रतिनिधींमुळे मदत होते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >