Wednesday, October 21, 2026

प्रसिद्ध सुवर्णकार थिरु वुमिडी एथिराज यांचे निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजली

भारताचे प्रसिद्ध सुवर्णकार आणि कारागीर थिरु वुमिडी एथिराज यांचे बुधवारी (२१ ऑक्टोबर २०२६) चेन्नई येथे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले. १९४७ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना भेट देण्यात आलेल्या ऐतिहासिक 'सेंगोल' (राजदंड) ची निर्मिती केल्यामुळे ते विशेष प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनानंतर उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पत्नी सुमित्रा वुमिदी यांचे त्यांच्या आधीच निधन झाले होते. त्यांच्या पश्चात विजय भारती, उदय कुमार वुमिदी आणि विजयेंद्रन वुमिदी हे तीन मुलगे, तसेच नातवंडे आणि पणतवंडे असा परिवार आहे.

आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चेन्नईतील प्रसिद्ध 'वुमिडी बंगारू ज्वेलर्स' (Vummidi Bangaru Jewellers) कुटुंबातील एक ज्येष्ठ सदस्य असलेल्या थिरु वुमिडी एथिराज यांनी, ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक असलेल्या सुवर्णजडित, रौप्य 'सेंगोल'च्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले होते. मे २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन भारतीय संसद भवनात 'सेंगोल'ची स्थापना करण्यात आली, ज्यामुळे त्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. या प्रसंगी वुमिडी एथिराज यांचा विशेष सन्मानही करण्यात आला होता. वुमिडी कुटुंब चेन्नईमध्ये दागिने निर्मितीच्या एका प्रतिष्ठित परंपरेशी संबंधित आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

एथिराज यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटले, 'थिरु वुमिडी एथिराज यांना ऐतिहासिक 'सेंगोल' घडवण्यातील त्यांच्या योगदानासाठी सदैव स्मरणात ठेवले जाईल; हा सेंगोल तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांना प्रदान करण्यात आला होता. अनेक वर्षांनंतर, २०२३ मध्ये, आमच्या सरकारला नवीन संसद भवनात या सेंगोलला सन्मानाचे स्थान देण्याचा बहुमान मिळाला. त्या काळात, मला थिरु वुमिडी एथिराज यांची भेट घेण्याचे आणि आपल्या राष्ट्रासाठी व संस्कृतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे भाग्य लाभले होते. त्यांचे जीवन आणि त्यांची कलाकुसर ही भारताच्या गौरवशाली परंपरा आणि आपल्या राष्ट्रीय प्रवासातील एक उल्लेखनीय दुवा दर्शवते. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.'

उपराष्ट्रपतींनी केला शोक व्यक्त

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी देखील 'X' वर पोस्ट करत दुःख व्यक्त करताना म्हटले, 'थिरु वुमिडी एथिराज यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. भारताच्या सभ्यताविषयक वारशाचे पवित्र प्रतीक असलेल्या ऐतिहासिक 'सेंगोल'च्या निर्मितीतील त्यांचे योगदान सदैव आदर आणि कृतज्ञतेने स्मरणात राहील. भारताच्या समृद्ध दागिने घडवण्याच्या परंपरेच्या जपणुकीत त्यांनी दिलेले अमूल्य योगदान एक चिरंतन वारसा म्हणून मागे राहिले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि प्रियजनांच्या दुःखात मी सहभागी आहे, त्यांना माझ्या मनापासून संवेदना.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >