CA Inter Result 2026 : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे सप्टेंबर २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत नाशिकच्या साक्षी चांडक आणि मुंबईच्या नील शहाने देशात संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. दोघांनीही प्रत्येकी ५०२ गुण मिळवत ८३.६७ टक्के गुणांची नोंद केली.
चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नाशिकच्या साक्षीच्या यशामुळे नाशिक शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या परीक्षेत चेन्नईच्या श्रुती व्ही. हिने ४९२ गुणांसह ८२ टक्के मिळवून देशात दुसरा क्रमांक पटकावला. तर सुरतच्या प्रेम अग्रवालने ४९० गुण आणि ८१.६७ टक्के मिळवत तिसरे स्थान मिळवले.
देशातील पहिले तीन टॉपर
'आयसीएआय'कडून ऑल इंडिया लेव्हलवरील पहिल्या तीन टॉपर्सची यादीदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे:
१. ऑल इंडिया पहिला क्रमांक (ऑल इंडिया फर्स्ट रँक - ८३.६७ टक्के):
नील राजेश शाह (मुंबई) – ५०२ गुण
साक्षी चांडक (नाशिक) – ५०२ गुण
(या दोघांनी संयुक्तपणे देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.)
२. ऑल इंडिया दुसरा क्रमांक (ऑल इंडिया सेकंड रँक - ८२ टक्के):
श्रुती व्ही (चेन्नई) – ४९२ गुण
३. ऑल इंडिया तिसरा क्रमांक (ऑल इंडिया थर्ड रँक - ८१.६७ टक्के%):
प्रेम अग्रवाल (सुरत) – ४९० गुण
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या CA इंटरमिजिएट सप्टेंबर 2026 परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. 22 ऑक्टोबर रोजी ...
सप्टेंबर २०२६ परीक्षेची आकडेवारी आणि निकाल टक्केवारी
यावर्षीच्या सीए इंटरमीडिएट परीक्षेचा एकूण निकाल खालीलप्रमाणे लागला आहे:
ग्रुप-१ (Group-I): परीक्षा दिलेल्या १,००,३०१ उमेदवारांपैकी २३,२१० उमेदवार उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी २३.१४% इतकी आहे.
ग्रुप-२ (Group-II): परीक्षा दिलेल्या ६८,४०० उमेदवारांपैकी १२,९३८ उमेदवार उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी १८.९२% आहे.
दोन्ही ग्रुप (Both Groups): ३८,३३९ उमेदवारांनी दोन्ही ग्रुपची परीक्षा दिली होती, त्यापैकी ५,०६६ उमेदवार उत्तीर्ण झाले असून, ही टक्केवारी १३.२१% इतकी आहे.
या परीक्षेच्या माध्यमातून एकूण १४,८१८ उमेदवार सीए इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा
सीए इंटरमिजिएटसारख्या आव्हानात्मक परीक्षेत देशात संयुक्त प्रथम क्रमांक मिळवणे ही मोठी कामगिरी मानली जाते. नाशिकच्या साक्षीने मिळवलेल्या या यशामुळे शहराच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे. तिच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.