Kumbh Mela: कुंभमेळ्यात एकूण आखाडे किती? वेगळेपण काय? सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याला 31 ऑक्टोबर 2026 पासून सुरूवात होणार आहे. या कुंभमेळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या कुंभमेळ्याचं प्रमुख आकर्षण असतं ते आखाडे... या आखाड्यांचं महत्त्व काय? वेगळेपण काय? ते सर्व जाणून घ्या.
October 23, 2026 04:51 PM
Kumbh Mela: कुंभमेळ्यात एकूण आखाडे किती? वेगळेपण काय? सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर (Photo: ANI)
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याची लगबग सुरू झाली आहे. 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहण झाल्यानंतर या सोहळ्याला सुरूवात होईल. साधु संतांचे आखाडे या ठिकाणी जमण्यास सुरूवात होईल. कुंभमेळ्यात आखाड्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुंभमेळ्यात एकूण 13 आखाडे भाग घेतात. यात 7 शैव, 3 वैष्णव आणि 3 उदासीन आखाडे आहेत. नाशिक कुंभमेळ्यात अमृतस्नानावेळी शैव आणि वैष्णव आखाडे वेगवेगळे स्नान करतात. रामकुंडावर वैष्णव, तर कुशावर्तावर शैव आखाडे स्नान करतात. उदासीन आखाडेही कुशावर्तावरच अमृतस्नान करतात. शैव आखाडे हे शिवाचे, तर वैष्णव आखाडे हे विष्णुंचे उपासक आहेत. उदासीन आखाडे आखाडे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांचे सुपुत्र 'श्रीचंद देव' यांच्या उदासीन संप्रदायाच्या विचारसरणीवर आधारित आहेत.
शैव आखाडे
श्री पंचदशनाम जुना आखाडा: हा सर्वात मोठा आणि प्राचीन आखाडा मानला जातो. या आखाड्यात नागा साधूंची संख्या सर्वाधिक असते. अमृतस्नानात या आखाड्याला पहिला मान मिळेतो. या आखाड्यात भस्म आणि दाढीवाले नागा साधू असतात. यांच्या हातात लाल आणि केसरी ध्वज असतो. या आखाड्यात दत्तात्रयांचं पूजन होतं.
श्री पंचदशनाम आवाहन आखाडा: जुना आखाड्याशी जोडलेला हा एक प्रमुख आखाडा असून कुंभमेळ्यातील मिरवणुकीत यांचा सहभाग मोठा असतो. जुना आखाड्यानंतर अमृत स्नानाच्या वेळी त्यांना नदीत स्नान करण्याची संधी मिळते. या आखाड्यातील साधु साध्या भगव्या पोशाखात असतात. त्यांच्या केसरी ध्वज असतो. हे साधु योगावर लक्ष केंद्रीत करतात.
श्री पंच अग्नी आखाडा: या आखाड्यात प्रामुख्याने केवळ ब्रह्मचारी साधूंनाच दीक्षा दिली जाते आणि ते अग्नीची विशेष उपासना करतात. यांच्या शरीरावर राख लावलेली असते आणि केसरी किंवा लाल पोषाख असतो. यांची ओळख नागा संन्यासाठी साधू अशी आहे.
श्री पंचायती निरंजनी आखाडा: हा आखाडा शिस्त आणि अध्यात्मासाठी प्रसिद्ध असून, यामध्ये उच्चशिक्षित साधू-महंतांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असतो. या आखाड्याचा पोषाख केसरी रंगाचा असतो. या आखाड्याच्या केशरी ध्वजावर त्रिशूल असते.
श्री पंचदशनाम आनंद आखाडा: हा आखाडा आपल्या आनंदमयी आणि भक्तीपूर्ण धार्मिक परंपरांसाठी ओळखला जातो. भगवान शिवाची पूजक असतात. यांचा पोषाख केसरी असतो. त्रिशूलासह केसरी ध्वज असतो.
श्री पंच अटल आखाडा: हा देखील एक प्राचीन शैव आखाडा असून यात प्रामुख्याने तपाचरणावर भर दिला जातो. या आखाड्याचा ध्वज पिवळा किंवा केसरी असतो.तर पोषाख केसरी असतो.
श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा: या आखाड्याचे साधू महाकालेश्वर (उज्जैन) आणि त्र्यंबकेश्वर येथे विशेष साधना करतात. सर्वात शक्तिशाली शैव आखाड्यांपैकीएक आहे. तीन रेषा असलेलं भस्म लावात. ध्वज लाल रंगाचा असतो.
प्रयागराज येथे महाकुंभमेळा पार पडल्यानंतर आता नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे वेध लागले आहेत. 31 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजून 2 मिनिटांच्या अभिजात ...
वैष्णव आखाडे
श्री दिगंबर अणी आखाडा:वैष्णव आखाड्यांमध्ये हा सर्वात मोठा आखाडा मानला जातो. कुंभमेळ्याच्या मिरवणुकीत या आखाड्याला अग्रक्रम असतो. हा आखाडा प्रामुख्याने भगवान विष्णूंचे अवतार असलेले प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण आणि त्यांचे परमभक्त हनुमान यांच्या उपासनेसाठी प्रसिद्ध आहे. या साधुंच्या एका हातात जपमाळ तर दुसऱ्या हातात भाला किंवा चिमटा असतो. या साधूंच्या माथ्यावर वैष्णव संप्रदायाचा वैशिष्ट्यपूर्ण 'ऊर्ध्वपुंड्र' (उभा टिळा) लावलेला असतो. या आखाड्याचे साधू पूर्णपणे पांढरे वस्त्र परिधान करतात.
श्री निर्वाणी अणी आखाडा: हा वैष्णव संप्रदायातील तीन प्रमुख अणी आखाड्यांपैकी एक आहे. हा आखाडा प्रामुख्याने प्रभू श्रीराम, भगवान विष्णू आणि हनुमानजींचे निस्सीम उपासक असलेल्या 'नागा वैष्णव' साधूंचा आखाडा म्हणून ओळखला जातो. हनुमानाची भक्ती आणि सेवाभाव हे या आखाड्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. दिगंबर अणी आखाड्याप्रमाणेच निर्वाणी आखाड्याचे साधूही पूर्णपणे पांढरे वस्त्र परिधान करतात.या आखाड्याचा कारभार कोणत्याही एका मठाधीशाच्या हाती नसून 'पंचायती राज' (पंच परमेश्वर) पद्धतीद्वारे चालवला जातो.
श्री निर्मोही अणी आखाडा: हा वैष्णव संप्रदायातील अत्यंत प्रतिष्ठित आखाडा असून देशभरात यांचे अनेक मठ आहेत. हा आखाडा प्रामुख्याने प्रभू श्रीरामांचे बालस्वरूप (रामलला) आणि भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी प्रसिद्ध आहे. निर्मोही आखाड्याचे साधू पूर्णपणे पांढरे वस्त्र परिधान करतात.या आखाड्यात प्रभू श्रीराम आणि हनुमानजींसोबतच भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची (बालकृष्ण) विशेष उपासना केली जाते.
उदासीन आखाडे
श्री पंचायती आखाडा बडा उदासीन: हा उदासीन संप्रदायातील मुख्य आणि मोठा आखाडा आहे. त्यांचे साधू पांढरी वस्त्रे परिधान करतात आणि ध्यान-साधनेला प्राधान्य देतात. या आखाड्यात हिंदू धर्म आणि शिख परंपरेचा अनोखा समन्वय पाहायला मिळतो. या आखाड्याचे साधू त्यांच्या कठोर हठयोगासाठी आणि पंचाग्नि तपासाठी प्रसिद्ध आहेत.
श्री पंचायती आखाडा नया उदासीन: बड्या उदासीन आखाड्यातून काही वैचारिक मतभेदांमुळे या आखाड्याची स्थापना झाली. यांची दीक्षा आणि तत्त्वज्ञान जुन्या आखाड्यासारखेच परंतु व्यवस्थापन स्वतंत्र असते.
श्री पंचायती निर्मल आखाडा: हा आखाडा शीख परंपरेशी अतिशय जवळून जोडलेला आहे. गुरु गोविंद सिंग यांच्या प्रेरणेने याची स्थापना झाली. येथील साधू पूर्णपणे पांढऱ्या वस्त्रात असतात आणि गुरु ग्रंथ साहिबाचा आदर करत हिंदू रीतीरिवाजांचे पालन करतात.