
Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील राणेनगर उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार महिला वकिलाचा मृत्यू झालाय. शीतल दीपक नरवले (वय ३०, रा. शुभम पार्क, नवीन नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी (दि. २३) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या शीतल यांच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कंटेनरच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, शीतल नरवले या नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने (एमएच १५ एफएल ९५९०) कामावर जात होत्या. हॉटेल स्नेहींतसमोरील राणेनगर उड्डाणपुलावरून प्रवास करत असताना मुंबईकडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे दुचाकीला जोरदार धडक बसली आणि शीतल या रस्त्यावर कोसळल्या.या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रयागराज येथे महाकुंभमेळा पार पडल्यानंतर आता नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे वेध लागले आहेत. 31 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजून 2 मिनिटांच्या अभिजात ...
अंबड पोलिसांकडून तपास सुरु
अपघात घडल्यानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पळून गेला होता. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थिती हाताळत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनरचालकाला द्वारका परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस पुढील तपास करत आहेत.
कामासाठी घराबाहेर पडलेल्या एका महिला वकिलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाल्याने राणेनगर परिसरात शोककळा पसरली आहे.






