Friday, October 23, 2026

Uttar Pradesh : महोबा जिल्हा रुग्णालयात बैलांची एन्ट्री ! इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांची धावपळ; घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

महोबा जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात अचानक दोन बेवारस बैल घुसल्याने रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात अचानक दोन बेवारस बैल घुसल्याने रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, सरकारी रुग्णालयांमधील रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

नेमकी घटना काय घडली ?

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी उत्तर प्रदेशातील महोबा जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दोन बेवारस बैल आले. त्यानंतर ते आपत्कालीन विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. तेथील रुग्णांच्या नातेवाईकांनी बैलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील एका बैलाने लोकांना चकवा देत थेट आपत्कालीन विभागात प्रवेश केला. रुग्णालयात उपचार सुरू असताना अचानक बैल आत घुसल्याने उपस्थितांची धावपळ उडाली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या अनपेक्षित प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली.

कर्मचाऱ्याच्या धाडसामुळे बैलाला बाहेर काढले

बैल आपत्कालीन विभागात शिरल्यानंतर त्याला बाहेर काढणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने पुढाकार घेतला. त्याने धाडस दाखवत बैलाला बाहेर काढले. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही मोठी हानी झाली नसली, तरी रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे जनावरे प्रवेश करणे ही चिंतेची बाब मानली जात आहे.

 
 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

रुग्णालय प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर महोबा जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रुग्णालयात गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी रुग्ण येत असतात. अशा ठिकाणी बेवारस जनावरे सहजपणे प्रवेश करत असतील, तर रुग्णांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे. घटनेनंतर रुग्णालय प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांकडून स्पष्ट प्रतिक्रिया मिळाली नसल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून रुग्णालयातील सुरक्षेवर चर्चा केली जात आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांनी केली सुरक्षेची मागणी

या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या ब्रजराज सिंह यांनी सांगितले की, दोन बैल आपत्कालीन विभागात घुसल्याचे पाहून मोठी दुर्घटना घडण्याची भीती वाटली होती. मात्र, सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारांवर योग्य देखरेख ठेवणे आणि बेवारस जनावरे आत येऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

सरकारी रुग्णालयांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत

महोबा जिल्हा रुग्णालयातील या घटनेमुळे रुग्णालय परिसरातील स्वच्छता, देखरेख आणि सुरक्षा व्यवस्थेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. आपत्कालीन विभागात रुग्णांवर उपचार सुरू असताना अशा घटना घडल्यास उपचार प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याबरोबरच रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात बैल घुसल्याच्या प्रकारामुळे सरकारी आरोग्य संस्थांमधील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >