
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कार्यकारी समितीवर भारत विभागाचे प्रतिनिधी (Regional Representative) म्हणून निवड झाली आहे. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन, लंडन मुख्यालयाचे उपमहासचिव जार्विस मातिया यांनी 20 ऑक्टोबर 2026 रोजी पत्र पाठवून त्यांच्या या नियुक्तीची अधिकृत घोषणा करत त्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र विधिमंडळ आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेसाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
केपटाऊन परिषदेत शिक्कामोर्तब
गेल्याच महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळ आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी राहुल नार्वेकर यांच्या या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, लंडन ही राष्ट्रकुलातील देशांमधील विधिमंडळांमध्ये सहकार्य, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि सुशासनाला प्रोत्साहन देणारी महत्त्वाची जागतिक संस्था आहे. या संस्थेच्या कार्यकारी समितीवर भारत विभागाचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांची निवड होणे ही देशासह राज्य विधिमंडळाच्या संसदीय परंपरेसाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे. देशातील सर्वप्रथम स्थापित झालेल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या शिरपेचात यामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रमुख नेत्यांकडून अभिनंदन
या प्रतिष्ठेच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र विधानपरिषदेचे माननीय सभापती तथा राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेचे पदसिद्ध सह-अध्यक्ष प्रा. राम शिंदे, उपसभापती सचिन अहिर आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी राहुल नार्वेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
नवी दिल्ली : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपण जो 'अमृत महोत्सव' साजरा केला, तो केवळ एक सोहळा नव्हता. तर तो आपल्या जुन्या ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा वाढलेला दबदबा
या महत्त्वाच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्र विधिमंडळाला राष्ट्रकुलातील विविध देशांच्या प्रतिनिधीगृहांशी संवाद साधण्याची, उत्तम संसदीय पद्धतींची देवाणघेवाण करण्याची आणि जागतिक स्तरावर लोकशाही संस्था अधिक सक्षम करण्यासाठी योगदान देण्याची संधी मिळणार आहे. जागतिक संसदीय सहकार्याच्या क्षेत्रात महाराष्ट्र विधिमंडळ आपला सहभाग अधिक प्रभावीपणे नोंदविणार आहे.
5 नोव्हेंबर रोजी महत्त्वाची परिचयात्मक बैठक
राष्ट्रकुल संसदीय मंडळ कार्यकारी समितीतील नवीन विभागीय प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसाठी आगामी गुरुवार, दिनांक 05 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 08.00 वाजता (GMT) एक विशेष परिचयात्मक बैठक (Orientation Meeting) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कार्यकारी समिती सदस्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि संस्थेची प्रशासकीय कार्यचौकट (Governance Framework) यावर मार्गदर्शन केले जाणार असून, 2027 च्या मध्य-वर्षीय बैठकीच्या (Mid-Year Meeting) पूर्वतयारीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.






