Saturday, October 24, 2026

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! धारावीकरांना दिलासा; सायन उड्डाणपुलावरून 28 महिन्यांनंतर BEST बस धावणार

सायन रेल्वे ओव्हरब्रिज पुन्हा सुरू झाल्यामुळे बेस्टने सायन, धारावी आणि आसपासच्या भागातून जाणाऱ्या 14 बस सेवांचे मूळ मार्ग पुन्हा सुरू केले आहेत.

मुंबई: सायन आणि धारावीकरांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या बेस्ट बस पुन्हा 28 महिन्यांनंतर सायन उड्डाणपुलावरून धावतेय. सायन रेल्वे ओव्हरब्रिज पुन्हा सुरू झाल्यामुळे बेस्टने सायन, धारावी आणि आसपासच्या भागातून जाणाऱ्या 14 बस सेवांचे मूळ मार्ग पुन्हा सुरू केले आहेत. पुलाच्या दुरुस्तीच्या आणि पुनर्बांधणीच्या कामामुळे बेस्ट बसच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आले होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना बस पकडण्यासाठी वळसा घालावा लागायचा. गुरूवारपासून हा उड्डाणपुल सुरू झाल्यामुळे आता अनेक बस मार्ग पुन्हा पुर्ववत करण्यात येणार आहे.

गुरुवारपासून (22 ऑक्टोबर) 112 वर्षे जुना पुन:र्बांधणी केलेला पुल पुन्हा सुरू झाला आहे. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमाने शुक्रवार, २३ ऑक्टोबरपासून हे बेस्ट बसचे मार्ग पूर्ववत केले आहेत. 30 जून, 2024 पासून या पुलाचे पुनर्बांधणीचे काम सुरू होते, ज्यामुळे अनेक बस सेवांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागला होता. पुलावरून वाहतूक आता सुरळीत झाल्यामुळे, बसेस राणी लक्ष्मीबाई चौक, संत रोहिदास मार्ग आणि लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) या मार्गावरून बस पुन्हा सुरू होणार आहेत. ज्यामुळे सायन, धारावी, कलानगर आणि माहिम दरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारेल. Mid-Day ने दिलेल्या वृत्तानुसार, 181, 255 लिमिटेड, 348 लिमिटेड, A 312, 341, A 375, AC 505, A 376, A 7, A 22, 29 लिमिटेड, 411, 11 लिमिटेड आणि C 305 मूळ मार्गांवर परत येणाऱ्या या 14 बसेसचा समावेश आहे.

बस क्रमांक 181, 255 लिमिटेड आणि 348 लिमिटेड राणी लक्ष्मीबाई चौकावरून संत रोहिदास मार्ग आणि पिवळा बंगला मार्गे पुन्हा आपला प्रवास सुरू करेल आणि तापसे चौक, धारावी- सायन लिंक रोड आणि कलानगरच्या दिशेने पुढे जाईल. A 312 आणि 341 या मार्गांवरील बसेस रोड क्रमांक 8 आणि संत रोहिदास मार्गावरून जातील आणि त्यानंतर LBS मार्गाकडे जातील. एव्हरर्ड नगर आणि कलानगर मार्गावर धावणारी A 375 बस वसंतराव नाईक मार्ग, राणी लक्ष्मीबाई चौक, संत रोहिदास मार्ग, पिवळा बंगला आणि तपासे चौक मार्गे मूळ मार्गावर परतेल. लोकमान्य टिळक रुग्णालयाजवळील राष्ट्रसेविका लक्ष्मीबाई केळकर मार्गावरून कार्यरत असलेल्या A-7, A-22, 29 लिमिटेड आणि 411 या बस, स्वामी श्री वल्लभदास मार्ग आणि संत रोहिदास मार्गे LBS मार्गे पुन्हा सुरू होतील.

बस क्र. 11 चा लिमिटेड बसमध्ये समावेश होतो. ही बस वसंतराव नाईक मार्ग, राणी लक्ष्मीबाई चौक, संत रोहिदास मार्ग आणि पिवळा बंगला मार्गे LBS रोडवरून पुढे जाईल. C 305 ही बस सुद्धा वसंतराव नाईक मार्ग, राणी लक्ष्मीबाई चौक, संत रोहिदास मार्ग, एलबीएस मार्ग, नाईक नगर, छाया मार्ग आणि धारावी डेपो मार्गे आपल्या मूळ मार्गे पुन्हा येईल. एव्हरर्ड नगर आणि माहिम रहेजा हॉस्पिटलच्या मार्गावर धावणारी AC-505 बस कलानगरकडे जाण्यापूर्वी वसंतराव नाईक मार्ग, राणी लक्ष्मीबाई चौक, संत रोहिदास मार्ग, एलबीएस मार्ग, नाईक नगर, छाया मार्ग, पिवळा बंगला आणि तपासे चौक मार्गे आता धावेल. A 376 बस एव्हरार्ड नगरवरून वसंतराव नाईक मार्ग, राणी लक्ष्मीबाई चौक, संत रोहिदास मार्ग आणि पिवळा बंगला मार्गे निघून, पुढे तापसे चौक, मुथु रामलिंगम मार्ग आणि बनवारी कंपाऊंडमार्गे रहेजा हॉस्पिटल आणि माहीम बस डेपोच्या दिशेने पुढे जाईल.

बेस्टने आपल्या वातानुकूलित A 176 बसच्या मार्गात बदल केला आहे, जी पूर्वी धारावी डेपो आणि माहीममधील हिंदुजा हॉस्पिटलमार्गे वर्तुळाकार मार्गावर धावत होती. तिचा आता आकाशगंगा सोसायटी आणि धारावी डेपो दरम्यानचा वळणमार्ग रद्द करण्यात आला असून, ही बस आता संत रोहिदास मार्ग आणि वसंतराव नाईक मार्गे राणी लक्ष्मीबाई चौकापर्यंत जाईल. धारावी बस डेपो आणि कला किल्ला येथील थांबा रद्द करण्यात आला आहे. एव्हरार्ड नगरकडून कलानगरकडे जाणारी बस A 356 कोणत्याही बदलांशिवाय तिच्या सध्याच्या मार्गावरूनच धावेल. सायन पूल पुन्हा सुरू झाल्याने आणि बेस्ट सेवा पूर्ववत झाल्याने, वर्षभराहून अधिक काळ मार्गातील बदलांना सामोरे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सायन आणि धारावीमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता पूर्ववत झालेल्या कनेक्टिव्हिटीचा फायदा होऊ शकतो, तर एसी-१७६ वापरणाऱ्यांनी सुधारित मार्ग आणि बंद केलेल्या थांब्यांची नोंद घ्यावी.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >