Sunday, October 25, 2026

अल्पसंख्याकांच्या हक्कांवरून भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला फटकारले; 'सेन्याचे हुकूम बजावण्यापेक्षा स्वतःच्या जनतेच्या कल्याणावर लक्ष द्या'

संयुक्त राष्ट्र महासभेच्या तिसऱ्या समितीतील चर्चेदरम्यान भारताने पाकिस्तानच्या अल्पसंख्याक हक्कांवरील भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. भारताचे प्रथम सचिव रघू पुरी यांनी पाकिस्तानला स्वतःच्या नागरिकांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. जम्मू-काश्मीरबाबतही भारताने आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली.

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) तिसऱ्या समितीमधील एका संवादात्मक चर्चेदरम्यान भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे. पाकिस्तान स्वतःच्याच नागरिकांचे रक्षण करण्यात अपयशी ठरत असताना आंतरराष्ट्रीय मंचाचा गैरवापर करत असल्याचा जोरदार प्रहार भारताने केला आहे. तसेच जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तानने आपल्या बेकायदेशीर ताब्यातील सर्व भाग रिकामा करावा, अशी स्पष्ट मागणी भारताने केली आहे.

आंतरराष्ट्रीय मंचाचा गैरवापर

संयुक्त राष्ट्र महासभेच्या तिसऱ्या समितीमध्ये अल्पसंख्याक मुद्द्यांवरील विशेष प्रतिनिधींसोबत झालेल्या संवादात्मक चर्चेत भारताच्या स्थायी मिशनचे प्रथम सचिव, रघु पुरी यांनी पाकिस्तानच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले की, अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानने आपल्या संकुचित राजनैतिक लाभासाठी आणि प्रसिद्धीसाठी जागतिक मंचाचा गैरवापर केला आहे. पाकिस्तानी प्रतिनिधींनी लष्करी मुख्यालयाच्या निर्देशांचे पालन करण्याऐवजी स्वतःच्या देशातील नागरिकांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

भारताची भूमिका आणि अल्पसंख्याकांचे अधिकार

रघु पुरी यांनी अधोरेखित केले की, सार्वभौम समानतेच्या तत्त्वावर आधारित अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करणे ही प्रामुख्याने प्रत्येक राष्ट्राची सार्वभौम जबाबदारी आहे. भारताच्या विविधतेची समृद्ध सांस्कृतिक परंपरा देशातील धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांसाठी असलेल्या भक्कम घटनात्मक संरक्षणातून स्पष्टपणे दिसून येते. तसेच, देशाच्या सर्वोच्च पदांपासून ते प्रमुख संस्थांपर्यंत आणि राष्ट्रीय विकासात अल्पसंख्याक समुदायांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

पाकिस्तानवर तीव्र शब्दांत ताशेरे

धार्मिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात आणि असुरक्षित समुदायांना सांभाळण्यात पाकिस्तान सातत्याने अपयशी ठरत आला आहे. असे असतानाही पाकिस्तानकडून धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याकांच्या मुद्यांवर भारतावर खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आत्मपरीक्षण करून स्वतःच्या देशातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा सज्जड दम भारताने युनोच्या मंचावरून भरला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >