Sunday, October 25, 2026

Shilpa Rao: बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्टमध्ये शिल्पा राव यांच्या अपमानाचा ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने व्यक्त केला निषेध

शनिवारी (२४ ऑक्टोबर) मुंबईच्या बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्ट मध्ये गायिका शिल्पा राव आपला कार्यक्रम पूर्ण करू शकली नाही. कार्यक्रमाच्या मध्यातच तिचा माइक बंद करण्यात आला आणि तिला मंचावरून घाईघाईने खाली उतरवल्यामुळे ती उपस्थितांचे आभारही मानू शकली नाही. कार्यक्रमानंतर घडलेल्या प्रकारामुळे आपले मन दुखावले असल्याचे सांगत या गायिकेने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. आता, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) एक निवेदन प्रसिद्ध करून गायिकेसोबत झालेल्या अपमानाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे आणि तिला प्रत्येक कायदेशीर मार्गाने पाठिंबा देण्याचे म्हटले आहे.

AICWA चे निवेदन काय?

X वरील त्यांच्या अधिकृत पेजवरून, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने या घटनेसंदर्भात एक विस्तृत निवेदन प्रसिद्ध केले असून मुंबईतील थेट कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिकेला दिलेल्या वागणुकीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. चित्रपट कामगार संघटनेने म्हटले आहे की, 'ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) २४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत आयोजित 'बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्ट' (BMP) च्या १० व्या आवृत्तीत, राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका शिल्पा राव हिच्यासोबत ज्या प्रकारची वागणूक देण्यात आली, त्याचा तीव्र निषेध करते.'

'शिल्पा राव मंचावर थेट सादरीकरण करत असताना, आयोजकांनी जबरदस्तीने तिचा माईक आणि दिवे बंद केले. ती काही काळ मंचावरच उभी राहिली. तिचा माईक बंद केल्यानंतर, 'कुटले खान प्रोजेक्ट'चे कुटले खान या दुसऱ्या कलाकाराला तिच्या जागी गाण्याची संधी देण्यात आली; तिचे बोलणे सुरू असतानाच त्याने गाणे सुरू केले. सादरीकरण सुरू असताना कलाकाराचा माईक आणि प्रकाशयोजना जबरदस्तीने बंद करणे आणि त्यानंतर तो मंच दुसऱ्या कलाकाराच्या हवाली करणे, ही अत्यंत अस्वीकारहार्य गोष्ट आहे.एका कलाकाराशी अशा प्रकारे वागणे तेही एका वर्धापनदिन सोहळ्याच्या मंचावर हे तिच्या प्रतिष्ठेचा आणि तिने मिळवलेल्या सन्मानाचा थेट अपमान आहे.' असे संघटनेने म्हटले आहे.

'AICWA शिल्पा राव यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. जर त्यांनी 'बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्ट' (Bollywood Music Project) विरोधात कोणतीही कारवाई करण्याचा निर्णय घेतला, तर AICWA त्यांना सर्व कायदेशीर मार्गांनी पाठिंबा देईल' असे आश्वासन AICWA ने दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >