Monday, October 26, 2026

अर्णब चक्रीवादळाचा धोका वाढला! आंध्र प्रदेशसह 5 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

बंगालच्या उपसागरात तयार झालेले अर्णब चक्रीवादळ वेगाने तीव्र होत असून, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याचा वेग ताशी १२५ किलोमीटरपर्यंत, तर झोत १४० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले अर्णब चक्रीवादळ वेगाने तीव्र होत आहे. हे वादळ आंध्रप्रदेशच्या दिशेने सरकत असून उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमध्ये वादळाभोवती फिरणारे ढग दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे वादळ २८ ऑक्टोबरच्या सकाळी आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग तशी ११५ ते १२५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकते, तर वाऱ्याचे झोत ताशी १४० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या प्रणालीच्या पश्चिम-वायव्य दिशेने पुढे जाण्याची आणि आज, २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात अधिक तीव्र होऊन त्याचे रूपांतर 'तीव्र चक्रीवादळात' (severe cyclonic storm) होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर, २७ ऑक्टोबर रोजी याच भागात त्याचे रूपांतर 'अति तीव्र चक्रीवादळात' (very severe cyclonic storm) होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, हे वादळ वायव्य दिशेने सरकत २८ ऑक्टोबर, २०२६ च्या सकाळपर्यंत आंध्र प्रदेश आणि यानम किनारपट्टीवर, बापटला आणि विशाखापट्टणम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.'

हवामान विभागाने दर्शवलेल्या अंदाजानुसार, 'अर्णब' (Arnab) या आगामी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे, २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि यानममध्ये; २८ ऑक्टोबर रोजी ओडिशामध्ये; २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी छत्तीसगडमध्ये; आणि २९ ऑक्टोबर रोजी पूर्व उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, २७ आणि २९ ऑक्टोबर रोजी ओडिशामध्ये; २८ ऑक्टोबर रोजी विदर्भ आणि तेलंगणामध्ये; २९ ऑक्टोबर रोजी झारखंडमध्ये; २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी बिहारमध्ये; तसेच ३० ऑक्टोबर रोजी पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >