पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार राज्यांमध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालांवरून काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या राज्यांमध्ये एकूण 28 जागांसाठी निवडणुका झाल्या आणि काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. कर्नाटकमध्ये भाजप आणि जेडीएस आघाडीने चारही जागा जिंकल्या, तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपने चार आणि समाजवादी पक्षाने दोन जागा जिंकल्या. 23 ऑक्टोबर रोजी मतदान झाले आणि 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी सुरु झाली. या निवडणुका प्रामुख्याने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी होत्या. निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडले आहे.
सोशल मीडियावर पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले की, 'उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या 4 मोठ्या राज्यांमधील 28 जागांवर विधान परिषदेच्या निवडणुका. मतपत्रिका वापरून निवडणुका घेण्यात आल्या. अंदाज लावा काँग्रेसने किती जागा जिंकल्या?' अशी उपरोधिक पोस्ट करत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला टोमणा मारला. काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीतील कामगिरीवर हा एक राजकीय टोला मानला जात आहे.
MLC elections in 28 seats across 4 big states - Uttar Pradesh, Maharashtra, Bihar and Karnataka.
Elections held using ballot papers.
Guess how many seats Congress won? 🧐
— Narendra Modi (@narendramodi) October 28, 2026
कर्नाटकमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला. येथे भाजपने तीन जागा राखल्या आणि जेडीएसने बंगळुरू शिक्षक मतदारसंघ स्वतःकडे खेचला. जेडीएसचे उमेदवार ए.पी. रंगनाथ यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार पुट्टुण्णा यांचा 908 मतांनी पराभव केला. रंगनाथ यांनी 10,810 मते मिळवली तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला 9,902 मते मिळाली. भाजपने ईशान्य शिक्षक, आग्नेय पदवीधर आणि पश्चिम पदवीधर हे मतदारसंघ राखले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचार करूनदेखील काँग्रेसच्या पदरी निराशा पडली. बिहारमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना धक्का बसला. दरभंगा शिक्षक मतदारसंघात उमेदवार सुरेश प्रसाद राय यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार मदन मोहन झा यांचा 324 मतांनी पराभव केल्यानंतर प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाने राज्य विधान परिषदेत आपले खाते उघडले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीदेखील काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, 'राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पक्षाला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल. दिल्लीत भाजपच्या 'लोकतंत्र बचाव, अराजकता हटाओ' मोर्चादरम्यान एका सभेला संबोधित करताना नबीन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतरही लाल किल्ल्यावर परत येतील. कथित घुसखोरांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नांमुळे व्यथित झाल्याने काँग्रेस मतदार याद्या स्वच्छ करण्यास विरोध करत असल्याचा आरोपही नबीन यांनी केला.