Wednesday, October 28, 2026

Andhra Odisha Cyclone : 'अर्णब' चक्रीवादळाचा आंध्र-ओडिशात प्रचंड हाहाकार; विशाखापट्टणममध्ये १८ तासांत ढगफुटीसदृश पाऊस, ३ जणांचा मृत्यू तर ८७ हजार नागरिकांचे स्थलांतर

किनारपट्टीवर ताशी १२५ ते १३५ किलोमीटरच्या वादळी वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पावसामुळे मोठे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आंध्र प्रदेशात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे ३१ घरांची मोठी पडझड झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने युद्धपातळीवर आपत्कालीन उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.

विशाखापट्टणम : बंगालच्या उपसागरात आकारास आलेल्या 'अर्णब' या अतितीव्र चक्रीवादळाने मंगळवारी आंध्र प्रदेशच्या किनारी भागात धडक देत प्रचंड तांडव मांडले आहे. किनारपट्टीवर ताशी १२५ ते १३५ किलोमीटरच्या वादळी वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पावसामुळे मोठे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आंध्र प्रदेशात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे ३१ घरांची मोठी पडझड झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने युद्धपातळीवर आपत्कालीन उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.

विशाखापट्टणममध्ये पावसाचा नवा विक्रम, रेल्वे व विमान वाहतुकीला मोठा फटका

 या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका विशाखापट्टणम शहराला बसला आहे. शहरात अवघ्या १८ तासांच्या कालावधीत २०० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस जुलै महिन्यातील सरासरी पर्जन्यमानाच्या (१३३ मिमी) दीड पटीपेक्षा अधिक आहे. पावसाच्या या धुमाकूळामुळे दळणवळण व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. विजयवाडा आणि विशाखापट्टणम विमानतळांवरून उड्डाण करणारी २१ विमाने तातडीने रद्द करण्यात आली आहेत. सुमारे ५० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून विशाखापट्टणम-किरंदुल, राउरकेला-जगदलपूर आणि हिराखंड एक्सप्रेससह २२ प्रमुख गाड्यांच्या फेऱ्या ५ नोव्हेंबरपर्यंत रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी 'NTES' ॲप किंवा भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून खात्री करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

८७ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; हवाई दलाकडून २३ टन मदत साहित्य

आपत्तीच्या काळात जीवितहानी टाळण्यासाठी आंध्र प्रदेशातून ५७ हजार आणि ओडिशामधून ३० हजार अशा एकूण ८७ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बाधित नागरिकांच्या निवासासाठी दोन्ही राज्यांमध्ये मिळून तब्बल ४ हजार चक्रीवादळ निवारा केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून ओडिशातील १६ जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे, भारतीय हवाई दलानेही बचावकार्यात मोलाचे योगदान दिले आहे. हवाई दलाच्या दोन 'सी-१३० जे' (C-130J) विमानांद्वारे विजयवाडा येथे २३ टन मदत साहित्य आणि एनडीआरएफचे (NDRF) विशेष पथक तातडीने पाठवण्यात आले आहे.

प्रशासकीय यंत्रणा सतर्क; मुख्यमंत्र्यांकडून आढावा

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अमरावती येथील 'रिअल टाइम गव्हर्नन्स सोसायटी सेंटर'शी संपर्क साधून चक्रीवादळग्रस्त जिल्ह्यांतील स्थितीची सविस्तर माहिती घेतली आहे. बाधित क्षेत्रांमध्ये मदत आणि बचावकार्य वेगाने राबवण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह ९ राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

  • आंध्र प्रदेश व ओडिशा: सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस आणि सखल भागात पूर येण्याचा इशारा.
  • तेलंगणा व छत्तीसगड: २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी काही भागांत मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता.
  • महाराष्ट्र व मध्य प्रदेश: विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज.
  • बिहार व झारखंड: २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान पावसाचा अंदाज असून २९-३० ऑक्टोबरला बिहारमध्ये जोरदार पावसाची शक्यता.
  • उत्तर प्रदेश: २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >