Thursday, October 29, 2026

वर्ध्यात कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगांना मोठी चालना; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत 2100 कोटींचा सामंजस्य करार

वरुण बेव्हरेजेस वर्ध्यातील आर्वी येथे 2100 कोटींची गुंतवणूक करून अत्याधुनिक अन्नप्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. यामुळे 550 जणांना थेट रोजगार मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला आहे.

राज्यातील कृषी, अन्नप्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ उद्योगांना मोठी चालना देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनी वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे तब्बल 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक अत्याधुनिक एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. फळांचे ज्यूस, अन्नप्रक्रिया तसेच कृषीमालावर आधारित उद्योगांच्या विकासाला पूरक ठरणाऱ्या या गुंतवणुकीमुळे स्थानिक शेतकरी, कृषीपूरक व्यवसाय आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर 550 जणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'वर्षा' निवासस्थानी वरुण बेव्हरेजेस लिमिटेड आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालास चांगला भाव मिळून मूल्यवर्धनाच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

विदर्भातील औद्योगिक विकासाला चालना

या गुंतवणुकीमुळे वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा, पूरक व्यवसाय आणि स्थानिक आर्थिक व्यवहारांना गती मिळणार आहे. आर्वी येथील एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात दैनंदिन वापरातील ग्राहकोपयोगी वस्तू आणि पेयपदार्थांच्या निर्मितीसाठी अत्याधुनिक उत्पादन युनिट उभारण्यात येणार आहे. प्रस्तावानुसार, प्रकल्पाचे काम एप्रिल 2027 पासून सुरू करण्याचे नियोजन आहे.

प्रकल्पासाठी शासनाचे सहकार्य

प्रकल्पाच्या उभारणीला गती देण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक त्या सर्व कायदेशीर परवानग्या, नोंदणी आणि ना-हरकत प्रमाणपत्रांची प्रक्रिया सुलभ केली जाईल. शासनाच्या विद्यमान धोरणात्मक नियमांनुसार आणि तरतुदींनुसार, कंपनीला लागू असणारे सर्व लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांमार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल.

या वेळी आमदार सुमित वानखेडे, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र कुशवाह, उद्योग आयुक्त कादंबरी बलकवडे, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या आयुक्त व व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच वरुण बेव्हरेजेस लिमिटेडचे मुख्य परिचालन अधिकारी तथा तांत्रिक विभागाचे समूहप्रमुख राजिंदर जीत सिंग बग्गा आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >