
मुंबई: अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे वारकरी संप्रदायाचा गौरव वाढवणारे संत शिरोमणी रूपलालजी महाराज यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ₹80.26 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील 'वर्षा' निवासस्थानी पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या प्रकल्पामुळे वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती चळवळीचा वारसा आणि संत रूपलालजी महाराजांचे समाजप्रबोधनाचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचणार आहेत. मौजे जेठमलपूर येथे आकार घेणाऱ्या या स्मारकामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.
नवी दिल्ली: "कालपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या अशी मागणी करणारे नेते आता देशभरात झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत पूर्णपणे ...
विकास आराखड्यातील ठळक वैशिष्ट्ये:
-
पहिला व दुसरा टप्पा: भाविक, वारकरी आणि पर्यटकांसाठी आधुनिक व पर्यावरणपूरक धार्मिक, सांस्कृतिक आणि निवासी सुविधांची निर्मिती.
-
अत्याधुनिक सुविधा: सभामंडप, पोथीवाचन सभागृह, योग केंद्र, वस्तुसंग्रहालय, अन्नपूर्णा इमारत, शहानूर इमारत, दिंडी सभागृह, वसतिगृह, प्रवचन सभागृह आणि बहुउद्देशीय सभागृह.
-
पायाभूत सुविधा: शहानूर नदीवरील नवीन पूल, 2.40 किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता आणि संत रूपलालजी महाराजांचा भव्य पुतळा व इतर पुतळ्यांची उभारणी.
संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणाऱ्या संत रूपलालजी महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि धर्मप्रसाराचे महान कार्य केले. या राष्ट्रीय स्मारकामुळे बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांची राहण्याची व भोजनाची उत्तम सोय होणार असून हा परिसर एक प्रमुख सांस्कृतिक व आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित होईल. बैठकीत अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सविस्तर सादरीकरण केले. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.






