Thursday, October 29, 2026

अहिल्यानगरमध्ये ग्रीन वेस्ट डम्पिंग यार्डला भीषण आग! परिसरात धुराचे साम्राज्य; उपमहापौरांचे कडक निर्देश

अहिल्यानगरमधील ग्रीन वेस्ट डम्पिंग यार्डला भीषण आग लागल्याने परिसरात धुराचे साम्राज्य पसरले. या घटनेची दखल घेत उपमहापौरांनी प्रशासनाला कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. आगीच्या घटनेमुळे परिसरातील परिस्थितीकडे लक्ष वेधले गेले आहे.

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : शहरातील वारूळाचा मारुती परिसरातील कल्याण रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या महानगरपालिकेच्या ग्रीन वेस्ट डम्पिंग यार्डला 28 ऑक्टोबर रोजी मोठी आग लागली. डम्पिंग यार्डमध्ये मोठ्या प्रमाणावर जमा असलेल्या झाडांच्या पालापाचोळ्यासह कचऱ्यामुळे काही मिनिटांतच आगीने उग्र रूप धारण केले आणि संपूर्ण परिसरात धुराचे ढग पसरले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुमारे 12 ते 13 अग्निशमन गाड्यांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, कचऱ्यामधील आगीची धग कायम राहिल्यामुळे रात्री उशिरापर्यंत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी सकाळीही परिसरात धूर पाहायला मिळाला.

या घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर ॲड. धनंजय जाधव आणि नगरसेवक महेश लोंढे यांनी महापालिका अधिकारी आणि परिसरातील नागरिकांसह कचरा डेपोवर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. या वेळी उपमहापौर जाधव यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली.

यावेळी बोलताना उपमहापौर जाधव म्हणाले की, कल्याण रोडवरील कचरा संकलन केंद्राला लागलेली आग दुर्घटनेने की जाणीवपूर्वक लावली गेली, याचा तपास होणे गरजेचे आहे. 24 तास उलटून गेल्यावरही धूर कायम असल्याने परिसरातील नागरिकांना तीव्र त्रासाचा सामना करावा लागत आहे. यापूर्वीही नगरसेवक लोंढे यांनी यासंदर्भात लेखी तक्रारी व पाठपुरावा केला होता. संकलन केंद्राच्या ठिकाणी गार्बेज राहू नये आणि जरी असला तरी तो पेटू नये, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. हे कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशा सूचना उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि कायमस्वरूपी एका जबाबदार व्यक्तीची नेमणूक करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

नगरसेवक लोंढे यांनी सांगितले की, या केंद्रावर वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. रात्री 12 वाजेपर्यंत अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू होते. दोन महिन्यांपूर्वीच आपण उपायुक्तांना याविषयी पत्र दिले होते. मात्र, तरीही दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडली. उपमहापौरांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले असून, यापुढे अशी पुनरावृत्ती होणार नाही अशी दक्षता घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >