Thursday, October 29, 2026

दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा: शिवसेनेकडून 24 ट्रक्सद्वारे धाराशिवला दिवाळीचा शिधा रवाना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांना कडक इशारा

राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारसोबतच शिवसेनाही पूर्ण ताकदीने बळीराजाच्या पाठीशी उभी राहिली आहे. ‘जिथे आपत्ती, तिथे मदत’ या भूमिकेतून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने धाराशिव जिल्ह्यासाठी २४ ट्रक भरून दिवाळीचा शिधा रवाना करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वाहनांना हिरवा झेंडा दाखवला.

शिवसेनेचे कार्यकर्ते धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या घराघरांत जाऊन या साहित्याचे प्रत्यक्ष वाटप करतील. या मदत साहित्यात बेसन, साखर, रवा, मैदा, तूप, रांगोळी, पणत्या आणि शिवसेनेची खास दिनदर्शिका समाविष्ट आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मिळणाऱ्या सर्व शासकीय सवलतींशिवाय बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून ५ हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाईल. अन्नधान्याव्यतिरिक्त दुष्काळग्रस्त भागात चारा, पाण्याचे टँकर, पाण्याच्या टाक्या पुरवण्यावर भर दिला जाईल. तसेच, आर्थिक अडचणींमुळे मुलींची लग्ने खोळंबलेल्या कुटुंबांनाही शिवसेनेकडून मदत केली जात आहे.

संकटाच्या काळात शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीचा तगादा लावणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्या, बँका आणि सावकारांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला. असा त्रास झाल्यास त्वरित सरकार, प्रशासन किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमाच्या वेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार ओमराजे निंबाळकर, युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, नगरसेवक राकेश शिंदे, मराठवाडा समन्वयक बाजीराव चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >