Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातून भोंदूगिरीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. येवला परिसरातील एका आश्रमात धार्मिक विधीसाठी गेलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी उमाकांत खंडेश्वर महाराज याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. काही दिवसांपासून तो पोलिसांना चकवा देत फरार होता. अखेर दिंडोरी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला येवला येथील दत्तवाडी आश्रमात धार्मिक विधी करण्यासाठी गेली होती. यावेळी संशयित आरोपी उमाकांत खंडेश्वर महाराज याने तिचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. सुरुवातीला महिलेचा विनयभंग करण्यात आला आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली. घटनेनंतर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक-त्र्यंबकेश्वर दौऱ्याची प्रशासनाकडून जोरदार तयारी ...
महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्यापासून उमाकांत खंडेश्वर महाराज फरार होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. अखेर तीन दिवसांपूर्वी दिंडोरी परिसरात पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत नाशिक आणि परिसरात भोंदूगिरीशी संबंधित विविध प्रकरणे चर्चेत आली आहेत. यापूर्वी अशोक खरात याच्याविरोधातही धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप समोर आले होते. या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. आता येवला परिसरातील या नव्या प्रकरणामुळे धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी पुन्हा चर्चेत आली आहे. दरम्यान, उमाकांत खंडेश्वर महाराज याच्याविरोधातील प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.