Thursday, October 29, 2026

BMC Hospitals : महापालिका रुग्णालयांमधील रुग्णांच्या ताटात बासमती भात, स्वस्त दरातील भाजीपाला,कडधान्य खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी

विरोधकांची मागणी बहुमताने फेटाळत प्रस्ताव केले मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांसह प्रसुतीगृहांमध्ये आंतररुग्णांना दोन्ही वेळचे जेवणे आणि चहा नाश्ता पुरवण्यासाठी कडधान्य आणि भाजीपाला खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. यामध्ये काही भाज्या या अगदी सध्याच्या दराच्या तुलनेत पाव किलोच्या भावात खरेदी केल्या जात असून यावर समिती सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदवत या साहित्यांची तपासणी करण्यासाठी भांडारला अचानक भेटी दिली जावी. तसेच रुग्णांना सकस आहार मिळतो याची तपासणीही होणे गरजेचे असल्याचे सांगत रुग्णांचे जेवण आधी नर्सेस आणि इतरांनी खाऊन दाखवावे,नंतरच रुग्णांना दिले जावे अशीही मागणी केली. विशेष म्हणजे रुग्णांना बासमती तांदळाचा भात चालत नाही, तरीही याची खरेदी केली जात असल्याने सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. याची दखलही प्रशासनाने घेतली आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये पुढील तीन वर्षांसाठी कडधान्य, साख, बासमती तांदुह, शेंगदाणा तेल आदींच्या ८.७७ कोटी रुपये आणि भाजीपाला, फळे, अंडी, पाव दूध व चपाती आदींसाठी ४८.४० कोटी रुपयांच्या खरेदीचे प्रस्ताव मंजुरीला आले असता यामिनी जाधव यांनी रुग्णांना सकस आहार मिळायला हवा. यासाठी तज्ज्ञ आहार तज्ज्ञांची मदत घेतली जावी अशी सूचना केली.तर एमआयएमचे जमीर कुरेशी यांनी या वस्तूंची खरेदी आपण करतो आहोत तर यासाठी भरारी पथक नेमले पाहिजे अशी मागणी केली. तसेच लाईव्ह किचन असला पाहिजे. दुधाचा भाव वाढेल तसा दर वाढणार आहे मग कमी झाला तर कमी होईल असे कुठेच नमुद नाही असे सांगितले.

भाजपच्या प्रिती सातम यांनी आपणही गृहिणी असल्याचे कडधान्य आणि भाज्यांचे दर आम्हालाही माहित आहेत. पण याठिकाणी हिंगाचा दर प्रशासनाने १०७१ रुपये अंदाजित केला होता आणि त्यावर कंपनीने बोली लावत ४०० रुपयांमध्ये देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे हा हिंग देणार की देवून परत घेणार असा सवाल केला.तसेच सिटीसी चहा पावडरचा दर ५४६ रुपये अंदाजित आहे, तिथे कंत्राटदाराने २६० रुपयांची बोली लावली आहे. त्यामुळे या शिवम मिल्स सप्लायर्स या कंपनीच्या वतीने देण्यात येणाऱ्या साहित्यांची तपासणी करण्यासाठी आपण भांडार कक्षाला अचानक भेट द्यायला हवी अशी मागणी केली.

तर मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी कडधान्य आणि भाजीपाला पुरवण्यासाठीच्या दोन्हींसाठी एकच कंपनी असून मागील तीन वर्षांमध्ये किती भाज्या आणि कडधान्य खरेदी केले, त्यावर किती खर्च झाला आणि पुरवठादार कोण होते याची माहिती मागितली. आपल्याला रुग्णांना सकस आहार द्यायचा आहे. पण एवढया स्वस्त दरात जर या वस्तू मिळणार असतील तर त्यांचा दर्जा काय असणार? त्या सडक्या नासक्या तर नसतील ना असा सवाल किल्लेदार यांनी केला.

तर शीतल गंभीर यांनी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अनेक जागा असून त्याचठिकाणी भाज्यांची शेती करून त्याचा वापर तिथे करावा अशी सूचना केली. मिनाक्षी पाटणकर यांनी दर्जाबाबत शंका उपस्थित केली तर अजंता यादव यांनी रुग्णांना बासमती तांदुळ आपण देणार आहात असे म्हणता, पण प्रत्यक्षात रुग्णांच्या ताटात रेशनचा तांदुळ पडतो अशी टीका केली. उबाठाच्या श्रध्दा जाधव यांनी बासमती तांदुळ हा पेशंटला कधी देतो आपण असा सवाल करत या तांदळाची बिर्याणी बनवली असेल तर वापर होवू शकतो, पण असे काही आपण देत नाही. त्यामुळे हे स्वस्त दर म्हणजे १० किलोचा पुरवठा करायचा आणि शंभर किलो दाखवायचा असाच असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे केईएमसह इतर रुग्णालयांमधील वस्तू ठेवण्यात आलेल्या भांडाराची पाहणी करावी अशी सूचना केली.

काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी गरीब व गरजू रुग्णांना सकस आहार मिळावा यासाठी या वस्तूंची खरेदी असली तरी आरोग्य समिती अध्यक्षांसह आपण सर्वांनी अचानक भेट देवून याची पाहणी करणे गरजेच असल्याचे सांगितले. आज यामध्ये बासमती तांदुळ दाखवला आहे, उद्या पिशवी बासमती तांदळाची असेल आणि आतमध्ये तांदुळ वेगळा असेल तर आपण काय करणार असा सवाल केला.जर महापालिका मुख्यालयातील कँटीनमध्ये योग्यप्रकारे काळजी घेतली जात नाही तर तिथे कशी घेतली जाईल असा सवाल केला. तर शैलेश फणसे यांनी हा याचा दर्जा कसा असेल याबाबत स्पष्टता नसल्याने हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवण्याची सूचना केली. लक्ष्मी भाटीया यांनी या निविदेची विधीग्राह्यता संपली आहे तर हे कसे चालणार असा सवाल केला तर रमाकांत रहाटे यांनी १ डिसेंबर २०२५ मध्ये निविदा काढली जाते आणि प्रस्ताव आता मंजुरीला येतो ही बाब निदर्शनास आणून दिली. तर सभागृहनेते गणेश खणकर यांनी आपण स्वत: कांदिवलीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार घेतले आहे, तिथले जेवण योग्य नसते. त्यामुळे हा प्रस्ताव बनवणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्व रुग्णालयांमध्ये जावून तेथील जेवणाची चव घ्यावी. तसेच नर्सेसनाही जेवण प्रथम खायला भाग पाडायला हवे. जे ते खाऊ शकत नाही तर रुग्णांवर आपण का लादतोय असा सवाल करत प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यायला हवी असे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत तुलिफ मिरांडा आणि दिपमाला बढे यांनीही भाग घेतला होता.

यावर प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी सन २००० पासून अशाप्रकारे वस्तूंची आपण खरेदी करत आलो असून पूर्वी एक वर्षांसाठी खरेदी करायचो. पण पुढे निविदा काढताना मुदतवाढ द्यावी लागत असल्याने आता तीन वर्षांचे देत आहोत. यामध्ये एपीएमसीमध्ये ३६५ दिवसांमध्ये जो दर असतो त्यांचा सरासरी दर निश्चित करून त्यानुसार निविदा मागवली जाते. या स्वयंपाकगृहात बनवले जाणारे जेवण हे आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच बनले जाते असे त्यांनी सांगितले. तसेच अन्न व औषध प्रशासनही स्वतंत्र असून ते केव्हाही तेथील तपासणी करू शकते असे सांगितले. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी उपसूचना मतदानात नामंजूर करत मूळ प्रस्ताव मंजूर केला तसेच त्यानंतरचा भाजीपाल्याचाही प्रस्तावात उपसूचना मतदानात अधिक मताने नामंजूर करत मूळ प्रस्ताव मंजूर केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >