Wednesday, October 28, 2026

Mumbai Crime News: '15 लाख दे, तरच...!', तक्रारदाराकडे मागितले पैसे; लाच घेताना आयकर निरीक्षकाला अटक

या प्रकरणात अन्य कोणी सहभागी आहे का, याचाही तपास सुरू आहे.

Mumbai Crime News: बेनामी मालमत्तेशी संबंधित विभागीय कारवाई बंद करण्यासाठी 15 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) मुंबईतील एका आयकर निरीक्षकाला अटक केली आहे. सुभाष यादव असे आरोपी निरीक्षकाचे नाव आहे. मंगळवारी सीबीआयने सापळा रचून त्याला कथितरीत्या लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात अन्य कोणी सहभागी आहे का, याचाही तपास सुरू आहे.

20 लाखांची लाच मागितल्याचा आरोप

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध आयकर विभागाच्या बेनामी प्रतिबंधक युनिटमध्ये बेनामी मालमत्तेशी संबंधित विभागीय कारवाई सुरू होती. ही कारवाई बंद करण्यासाठी सुभाष यादव याने तक्रारदाराकडे 20 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

तक्रारदार आणि आरोपी यांच्यात कथितरीत्या वाटाघाटी झाल्यानंतर लाचेची रक्कम 15 लाख रुपये ठरल्याचे सांगण्यात आले. यानंतर तक्रारदाराने सीबीआयकडे तक्रार दाखल केली.

सीबीआयने रचला सापळा

तक्रारीची दखल घेत सीबीआयने सापळा रचला. यावेळी सुभाष यादव 15 लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारत असताना त्याला पकडण्यात आले. या प्रकरणी आरोपी निरीक्षकासह अन्य अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

त्यानंतर सीबीआयने आरोपीच्या निवासस्थानी झडती घेतली. या कारवाईत कथित गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे आणि 11 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले.

विशेष न्यायालयाने सुनावली कोठडी

अटकेनंतर आरोपीला मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. या प्रकरणात आणखी कोणाचे संबंध आहेत का, तसेच लाच प्रकरणाशी संबंधित इतर बाबींचा तपास सीबीआय करत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >