Maharashtra Weather News: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत असताना आता हवामानात बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरातील ‘अर्णब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भासह काही जिल्ह्यांत ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज, 29 ऑक्टोबर रोजी कोकणापासून विदर्भापर्यंत काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
- काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी; उबाठाचा मात्र सुफडा साफ, शरद पवार गटाला २ जागा मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच ...
मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता
पालघर, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या भागांत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांचा इशारा
धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिकचा घाटमाथा आणि जळगाव परिसरात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे वाढलेल्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.
पुणे आणि सातारा घाटमाथ्यावरही अलर्ट
पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाच्या सरी पडू शकतात.
मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज
छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भातील या जिल्ह्यांना येलो अलर्ट
अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांत येलो अलर्ट देण्यात आल्याचे वृत्त आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, विदर्भातील काही ठिकाणी हवामान कोरडे राहू शकते.
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
एकूणच, 29 ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. नागरिकांनी बाहेर पडताना हवामानाचा अंदाज तपासावा. विजांचा कडकडाट होत असताना मोकळ्या जागेत थांबणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.