Wednesday, October 28, 2026

Ahilyanagar News: कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या दोन गायींची सुटका; पोलिसांची धडक कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल

तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेप्ती नाका कल्याण रोड परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी अमानुषपणे व दाटीवाटीने नेण्यात येणाऱ्या दोन जर्सी गायींची सुटका केली आहे.

अहिल्यानगर: तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेप्ती नाका कल्याण रोड परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी अमानुषपणे व दाटीवाटीने नेण्यात येणाऱ्या दोन जर्सी गायींची सुटका केली आहे. रात्रीच्या सुमारास डायल 112 या आपत्कालीन यंत्रणेवर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नेप्ती नाका येथे एका पिकअप वाहनातून जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची गोपनिय माहिती आपत्कालीन यंत्रणेला प्राप्त झाली होती. या माहितीची त्वरित दखल घेत तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी एका पिकअप वाहनामध्ये दोन जर्शी गायी अत्यंत दाटीवाटीने, उपाशीपोटी आणि विनाअन्न-पाण्याचे क्रूरपणे डांबून त्यांची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून रज्जाक इब्राहिम पठाण (रा. पिंपळाचा मळा, ता. राहुरी) आणि पिकअप चालक नीलेश मनोहर बेल्हेकर (रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी) या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान पोलिसांनी 50 हजार रुपये किमतीची एक आणि 30 हजार रुपये किमतीची दुसरी अशा एकूण 80 हजार रुपये किमतीच्या दोन जर्सी गायी, तसेच 5 लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन, असा एकूण 5 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी आरोपींकडे जनावरांच्या वाहतुकीचा परवाना व वैध कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतीही कायदेशीर कागदपत्रे आढळली नाहीत. या प्रकरणी पोलिस नाईक महेश शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जनावरे वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >