मुंबई: राज्यातील मच्छीमार, मत्स्यशेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या 24 लाभार्थीभिमुख योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सुविधा सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे 'महाडीबीटी 2.0' प्रणालीवर 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने'अंतर्गत या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला.
राज्यात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी शासन प्रक्रिया पुनर्रचना (GPR) अंतर्गत विविध सुधारणा करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाडीबीटी 2.0 प्रणालीवर ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
घरबसल्या ऑनलाइन अर्ज करण्याची सोय
या नवीन सुविधेमुळे राज्यातील मच्छीमार आणि मत्स्यव्यवसायिकांना संबंधित योजनांसाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. अर्ज प्रक्रियेतील अनावश्यक कागदपत्रांची मागणी आणि ऑफलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्याची कटकट आता कमी होणार आहे. उपलब्ध शासकीय डेटाबेसच्या माध्यमातून आवश्यक माहिती मिळवणे तसेच विविध प्रमाणपत्रे ऑनलाइन उपलब्ध करणे आता शक्य झाले आहे.
मुंबई : ससून डॉकचा सर्वांगीण कायापालट करून देशातील आदर्श गोदी बनवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मच्छीमारांच्या मूलभूत सुविधांपासून स्वच्छता, ...
अनुदान थेट बँक खात्यात
या डिजिटल प्रक्रियेमुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून, मंजूर झालेले अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात जमा केले जाणार आहे. अर्ज प्रक्रिया सोपी झाल्यामुळे आणि सेवांचा जलद निपटारा होत असल्यामुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे घेता येईल. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मत्स्यव्यवसाय विभागाची कार्यक्षमता वाढणार असून, पात्र लाभार्थ्यांपर्यंत सर्व योजना पारदर्शक पद्धतीने पोहोचविणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.
अर्ज कुठे करावा?
महाडीबीटी 2.0 प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळ या अधिकृत लिंकला भेट द्यावी.