Friday, October 30, 2026

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला बारा वर्षे पूर्ण; राजकारणातील एक तप आणि विकासाचा नवा अध्याय!

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी १२ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने त्यांच्या राजकीय प्रवासातील विकासात्मक निर्णय, ऐतिहासिक विक्रम आणि महाराष्ट्राच्या वाटचालीचा घेतलेला हा खास आढावा.

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वानखेडे स्टेडियमवरील ऐतिहासिक शपथविधीला ३१ ऑक्टोबर, २०२६ रोजी बारा वर्षे अर्थात एक तप पूर्ण होत आहे. या निमित्ताने त्यांच्या राजकीय वाटचालीचा हा प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. ऑक्टोबर २०१४ च्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेला भारतीय जनता पक्ष सत्तापदी आला, त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची भूमिका राहिली होती. गेल्या १२ वर्षांत राजकारणाने अनेक नागमोडी वळणे घेतली असली, तरी पायाभूत सुविधा, विकासाभिमुख धोरणे आणि राज्याच्या राजकीय मातीतील जातीनिष्ठ मर्यादांवर मात करणे ही या तपपूर्ती वाटचालीची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली आहेत.

ऑक्टोबर २०२९ मध्ये सध्याच्या १५ व्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होईल, तेव्हा  देवेंद्र फडणवीस यांचा १९९९ ते २०१४ मधील १५ वर्षांचा विरोधी बाकावरील काळ आणि २०१४ ते २०२९ मधील (दोन वर्षे वगळता) १५ वर्षांचा सत्तापदावरील काळ, असा समतोल साधलेला असेल. संसदीय लोकशाहीत उल्लेखनीय कामगिरी करत जातीनिष्ठ मर्यादेवर मात करून मुख्यमंत्रीपद भूषविणे हे आगामी काळात अत्यंत आश्वासक मानले जात आहे.

प्रमुख क्रांतिकारी निर्णय आणि योजना

गेल्या १२ वर्षांच्या काळात महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे आणि क्रांतिकारी निर्णय घेतले गेले आहेत, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:

  • महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५: सरकारी सेवा गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी.

  • जलयुक्त शिवार अभियान: २०,५४४ गावांमध्ये पाणी साठवण क्षमता वाढली व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

  • मराठा आरक्षण (SEBC) कायदा २०१८: मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण देण्याची पहिली पायरी.

  • समृद्धी महामार्ग: विदर्भ आणि मराठवाड्याला मुंबईशी जलद वाटेने जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग.

  • उद्योग व पायाभूत सुविधा: 'मैत्री कायदा २०२३' द्वारे सुलभ व्यवसायाचे (Ease of Doing Business) अनेक निर्णय, अटल सेतू, ॲक्वा मेट्रो प्रकल्प आणि मिसिंग लिंक बोगदा निर्मिती.

  • सामाजिक कल्याण: अनाथ मुलांसाठी शिक्षण व नोकरीमध्ये एक टक्का आरक्षण.

महाराष्ट्रान सन २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठावा, हे त्यांचे स्वप्न आहे. यंदाच्या वर्षी अलनिनोमुळे निर्माण झालेले पाणीटंचाईचे संकट हे एक आव्हान असले, तरी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत तातडीची व दीर्घकालीन उपाययोजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र यावर नक्कीच मात करेल.

राजकीय विक्रम आणि ऐतिहासिक प्रवास

सन २०२४ ते २०२९ या १५ व्या विधानसभेच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून  वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख यांच्या पंक्तीत आपला सर्वाधिक कालावधी नोंदवला आहे. यापूर्वी २०१४ ते २०१९ सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवणारे ते आणि वसंतराव नाईक ही दोनच नावे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अधोरेखित होतात. तसेच, १४ व्या विधानसभेच्या काळात मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री ही तीनही महत्त्वाची पदे एकाच व्यक्तीने भूषवण्याचा अभूतपूर्व विक्रम त्यांनी केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >