Friday, October 30, 2026

मुंबई- बेंगळुरू प्रवास आता सुस्साट, 988 Km चं अंतर फक्त 16 तासांत पूर्ण करता येणार

Mumbai Bengluru Vande Bharat Sleeper Express: येत्या 1 नोव्हेंबर रोजी, अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत, बेंगळुरू- मुंबई स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

मुंबई: केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री- एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय ग्राहक व्यवहार- प्रल्हाद जोशी, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री- अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री- व्ही. सोमण्णा, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री- सुश्री शोभा करंदलाजे, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच कामगार आणि रोजगार राज्यमंत्री- कृष्णा बायरे गौडा, बेंगळुरू विकास मंत्री कर्नाटक सरकार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक 1 नोव्हेंबर 2026 रोजी एसएमव्ही बेंगळुरू स्थानकावर आयोजित कार्यक्रमात बेंगळुरू- मुंबई स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

'वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस' महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून सुटणारी किंवा तिथे पोहोचणारी पहिली 'स्लीपर वंदे भारत' ट्रेन असेल. ही एक्स्प्रेस आंध्र प्रदेश राज्यातूनही प्रवास करणार आहे. 'हावडा- कामाख्या- हावडा स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस' (गाडी क्रमांक 27575/ गाडी क्रमांक 27576) नंतर, मुंबई- बेंगळुरू- मुंबई 'वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस' ही देशातील दुसरी 'स्लीपर वंदे भारत' एक्स्प्रेस असेल. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतील प्रमुख शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही ट्रेन रात्रीच्या प्रवासाचा एक नवीन पर्याय उपलब्ध करून देईल.

बेंगळुरू- मुंबई स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटन सेवेचा तपशील

गाडी क्रमांक 06503 स्लीपर वंदे भारत ट्रेनला दिनांक 1 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 12.15 वाजता एसएमव्ही बेंगळुरू स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. ही एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी 06.15 वाजता मुंबई सीएसएमटी स्थानकावर पोहोचेल. ही एक्सप्रेस, हिंदूपुर, धर्मावरम, अनंतपुर, गुंतकल, रायचूर, कृष्णा, यादगीर, कलबुर्गी, सोलापूर, पुणे, कल्याण, ठाणे आणि दादर या स्थानकावर थांबेल.

नियमित सेवेचा तपशील

मुंबई सीएसएमटी- बेंगळुरू- मुंबई सीएसएमटी 'वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस'चा गाडी क्रमांक 27651/ 27652 असा असेल. मुंबई सीएसएमटी - एसएमव्ही बेंगळुरू - मुंबई सीएसएमटी स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस म्हणून चालवण्यात येईल. या एक्स्प्रेसची नियमित सेवा दिनांक 2 नोव्हेंबर 2026 पासून मुंबई सीएसएमटी स्थानकावरून नियमित करण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक 27651 डाऊन स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस दिनांक 2 नोव्हेंबर 2026 पासून आठवड्यातून मंगळवार वगळता इतरत्र 6 दिवस मुंबई सीएसएमटी स्थानकावरून रात्री 08.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता एसएमव्ही बेंगळुरू स्थानकावर पोहोचेल.

गाडी क्रमांक 27652 स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस दिनांक 3 नोव्हेंबर 2026 पासून आठवड्यातून सोमवार वगळता इतरत्र 6 दिवस एसएमव्ही बेंगळुरू स्थानकावरून रात्री  07.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.55 वाजता मुंबई सीएसएमटी स्थानकावर पोहोचेल. ही एक्स्प्रेस दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, यादगीर, रायचूर, गुंतकल आणि अनंतपुर स्थानकावर थांबेल. या एक्स्प्रेससाठी एक फर्स्ट क्लास एसी कोच, 4 सेकंड क्लास एसी कोच आणि 11 थर्ड क्लास एसी कोच अशी कोचेसची रचना करण्यात आली आहे.

'स्लीपर वंदे भारत' एक्स्प्रेसची रिझर्व्हेशन प्रोसेस येत्या 1 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. प्रवाशांना या एक्स्प्रेसचं रिझर्व्हेशन सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावरुन करता येणार आहे. शिवाय, प्रवासी तिकीट बुक करण्यासाठी 'रेलवन' ॲपचाही वापर करू शकतात. या विशेष गाड्यांच्या विविध स्थानकांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीइएस ॲप डाउनलोड करा.

स्लीपर वंदे भारत ट्रेनची विशेष वैशिष्ट्ये

  • वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस अनेक अत्याधुनिक सेवांनी परिपुर्ण आहे
  • रात्रीच्या प्रवासात आरामासाठी सोयीस्कर स्लीपिंग बर्थ
  • उपकरणे चार्ज करण्यासाठी फोन-चार्जिंग पॉइंट्स
  • सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा
  • स्वयंचलित दरवाजे
  • शारीरिकदृष्ट्या अक्षम किंवा मर्यादित हालचाल असलेल्या प्रवाशांसाठी विशेष सुविधा
  • गरज पडल्यास रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी आपत्कालीन बटणे आणि 'टॉकबॅक' प्रणाली.

या सुविधा विविध वयोगटांतील आणि गरजा असलेल्या प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास अधिक सुखद आणि सोयीस्कर बनवण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा एक भाग असलेली ही ट्रेन, देशाची अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्वावलंबनाप्रती असलेली वचनबद्धता दर्शवते. हे भारतीय रेल्वेच्या 'कनेक्टेड इंडिया' (एकमेकांशी जोडलेला भारत) या दूरदृष्टीवर प्रकाश टाकते, ज्यामध्ये 'वंदे भारत एक्सप्रेस' गाड्या आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >