
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने आपल्या प्रशिक्षक गटात मोठे आणि आश्चर्यकारक बदल केले आहेत. नवे मुख्य प्रशिक्षक किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली संघाने भारताचा माजी स्फोटक फलंदाज रॉबिन उथप्पा याची फलंदाजी प्रशिक्षकपदी, तर टी. दिलीप यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल मॅक्लेनाघन याच्याकडे गोलंदाजी प्रशिक्षकपदाची, तर धवल कुलकर्णी याच्याकडे विकासात्मक गोलंदाजी प्रशिक्षकपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सने यापूर्वी लसिथ मलिंगा, पारस म्हांब्रे आणि कार्ल हॉपकिन्सन यांच्याशी संबंध संपुष्टात आणले होते. मलिंगा 2024 पासून संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता, तर हॉपकिन्सन क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते.
रॉबिन उथप्पा प्रथमच आयपीएल संघाच्या प्रशिक्षक गटाचा भाग बनला आहे. त्याने 2022 च्या हंगामानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेतली होती. 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात उथप्पा मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता आणि नियमितपणे अंतिम अकरामध्ये खेळत होता. आता तो नव्या भूमिकेत कसा प्रभाव पाडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
[caption id="attachment_1070550" align="aligncenter" width="800"] अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशीद खानने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा विश्वविक्रम रचत इतिहास घडवला. शारजाह येथे ...
टी. दिलीप यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून विशेष ओळख निर्माण केली आहे. भारतीय संघाने जिंकलेल्या तीन आयसीसी विजेतेपदांच्या वेळी ते प्रशिक्षक गटाचा भाग होते. यामध्ये 2024 आणि 2026 चा टी20 विश्वचषक तसेच 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. रोहित शर्माच्या कार्यकाळातही ते संघासोबत जोडलेले होते. आता मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मासोबत त्यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे. मुंबई इंडियन्सने दिलेल्या माहितीनुसार, धवल कुलकर्णीकडे संपूर्ण वर्षभराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडूंचा विकास आणि प्रतिभावान खेळाडूंचा मजबूत गट तयार करण्याच्या कार्यक्रमात सातत्य राखता येणार आहे. पोलार्ड यांच्या नेतृत्वाखाली नव्या प्रशिक्षकसमोर डिसेंबरमध्ये होणाऱ्या लिलावापूर्वी खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची यादी तयार करण्याचे पहिले मोठे आव्हान असणार आहे.





