Friday, October 30, 2026

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये ‘रामकाल पथ’ आकाराला; 1.36 किमीच्या मार्गावर धार्मिक स्थळांचा वारसा जपणार

रामकाल पथाला धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरूप देण्यासाठी मार्गाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर रामायणातील विविध प्रसंग साकारले जात आहेत. आकर्षक रंगसंगतीच्या माध्यमातून या चित्रांमुळे मार्गाचे सौंदर्य वाढणार आहे.

नाशिक : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाविकांसाठी महत्त्वाचा ठरणारा ‘रामकाल पथ’ प्रकल्प वेगाने विकसित केला जात आहे. कुंभमेळा प्राधिकरण आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा उद्देश भाविकांचा प्रवास सुलभ करणे, गर्दीचे नियोजन करणे आणि पंचवटी परिसरातील ऐतिहासिक व धार्मिक वारसा जतन करणे हा आहे. सुमारे १.३६ किलोमीटर लांबीचा हा आध्यात्मिक आणि वारसा मार्ग असून, सीतागुंफा, काळाराम मंदिर, गोदाघाट आणि रामकुंड यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणार आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून तसेच परदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांना या ठिकाणांचे दर्शन घेणे अधिक सोयीचे होणार आहे.

वारसा जपत आधुनिक सुविधांचा विकास

कुंभमेळ्यातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रामकाल पथ प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पात वारसा संवर्धनासोबतच सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत.रामकुंड परिसराची मूळ शहरी रचना आणि ऐतिहासिक ओळख कायम ठेवून प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. दररोज येणारे भाविक आणि कुंभमेळ्यातील मोठी गर्दी लक्षात घेऊन पादचाऱ्यांसाठी सोयीस्कर मार्ग, सार्वजनिक जागा आणि आवश्यक सुविधांचा समावेश केला जात आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या ‘स्पेशल असिस्टन्स टू स्टेट्स फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट’ योजनेअंतर्गत निधी उपलब्ध झाला आहे.

रामकुंड आणि काळाराम मंदिर परिसराचे सुशोभीकरण

रामकाल पथ प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे ऐतिहासिक वास्तूंचे मूळ स्वरूप जपण्यावर देण्यात आलेला भर. रामकुंड परिसरातील इमारतींचे पुनर्संचयितीकरण करताना पारंपरिक स्थापत्यशैलीशी सुसंगत साहित्य आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.वास्तूंचे नक्षीकाम, साधेपणा, प्रमाणबद्धता आणि स्थानिक बांधकाम साहित्य यांचा विचार करून आराखडा तयार करण्यात आला आहे. काळाराम मंदिर परिसरातील वास्तुशैलीशी सुसंगत राहील, अशा पद्धतीने परिसराचा विकास केला जात आहे.

रामकाल पथाला धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरूप देण्यासाठी मार्गाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर रामायणातील विविध प्रसंग साकारले जात आहेत. आकर्षक रंगसंगतीच्या माध्यमातून या चित्रांमुळे मार्गाचे सौंदर्य वाढणार आहे. याशिवाय गोदाघाट सुशोभीकरण आणि इतर विकासकामेही सुरू आहेत.

विक्रेत्यांसाठी स्वतंत्र क्षेत्र; पुनर्विकासग्रस्तांना पर्यायी घरे

भाविकांना सुविधा उपलब्ध करून देतानाच स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेचाही विचार प्रकल्पात करण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र विक्रेता क्षेत्र अर्थात वेंडिंग झोन विकसित केले जात आहे. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांना व्यवसायासाठी नियोजित जागा उपलब्ध होणार आहे.प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या काही ठिकाणी इमारती हटविण्यात आल्या आहेत. संबंधितांना बांधकाम हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वाच्या माध्यमातून पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

वारसा संवर्धनाला प्राधान्य : आयुक्त मनीषा खत्री

नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रामकाल पथ प्रकल्पाबाबत माहिती देताना, ऐतिहासिक वारसा जपत आणि परिसराची मूळ रचना अबाधित ठेवून विकासकामे केली जात असल्याचे स्पष्ट केले.प्रकल्पात नियोजित फेरीवाला क्षेत्र आणि सुधारित सार्वजनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी पुनर्विकासाची आवश्यकता होती, तेथे पीपीपी तत्त्वावर आणि बांधकाम टीडीआरचा वापर करून संबंधितांना पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या दृष्टीने रामकाल पथ प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असून, धार्मिक पर्यटन, वारसा संवर्धन आणि भाविकांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने पंचवटी परिसराला नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >