Saturday, October 31, 2026

Simhastha Kumbh Mela : नाशिकमध्ये आज सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा; राष्ट्रपतींसह दिग्गज नेते उपस्थित राहणार, शहरात कडेकोट तयारी

सुमारे 1,500 व्हीआयपी या सोहळ्यासाठी नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.

Nashik News: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज, शनिवारी (31 ऑक्टोबर) नाशिकमध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. सुमारे 1,500 व्हीआयपी या सोहळ्यासाठी नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार शुक्रवारी रात्रीच नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी राष्ट्रपतींच्या दौऱ्याची तसेच ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली. सुरक्षा, वाहतूक, निवास, स्वागत व्यवस्था आणि आपत्कालीन यंत्रणांच्या तयारीचा संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला.

दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी ध्वजारोहण

सन 2027 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करण्यात येणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा होणार आहे. दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम नियोजित आहे.

यानंतर राष्ट्रपती त्र्यंबकेश्वर येथे जाणार असून, कुशावर्त येथे पूजा करणार आहेत. त्यानंतर त्या नाशिकमधील पोलीस अकादमीत विश्रांती घेतील. संध्याकाळी गोदाआरतीला उपस्थित राहून त्या दौऱ्याची सांगता करणार आहेत.

या सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ, जयकुमार रावल, अशोक उईके, राधाकृष्ण विखे पाटील, गुलाबराव पाटील, आकाश फुंडकर आणि नीतेश राणे आदी मंत्री उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.

धार्मिक विधींसाठी गुरुजी मिळणे कठीण

सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीमुळे नाशिकमधील धार्मिक विधी करणारे अनेक गुरुजी नियोजनात व्यग्र आहेत. त्यामुळे गृहप्रवेश, सत्यनारायण पूजा आणि अन्य धार्मिक विधींसाठी गुरुजी मिळणे कठीण झाले आहे. काही पूजाविधींसाठी यजमानांना किमान दोन दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.

शुक्रवारी झालेल्या ग्रामप्रदक्षिणा सोहळ्यात रामकुंड परिसरातील दशक्रिया विधी आणि उत्तरकार्य करणारे गुरुजी सहभागी झाले. तसेच सत्यनारायण पूजा, कलशपूजन आणि गृहप्रवेशाचे विधी करणारे गुरुजीही तपोवन आणि रामकुंड परिसरातील कार्यक्रमात सहभागी झाले. त्यामुळे पुढे ढकलता येणारे धार्मिक विधी काही दिवसांनी करण्याची विनंती यजमानांना केली जात असल्याचे चित्र आहे.

व्हीआयपींच्या स्वागतासाठी नाशिक सजले

राष्ट्रपती आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे. नाशिक शहरात ठिकठिकाणी भगवे ध्वज आणि पताका लावण्यात आल्या आहेत. स्वागतासाठी विविध सजावटीची प्रतीके उभारण्यात आली आहेत. नाशिक कुंभमेळा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेकडून सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, साधू-महंतांच्या नाराजीमुळे प्रशासनासमोरील आव्हानेही वाढली आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >