छत्रपती संभाजीनगरला 34 एसी इलेक्ट्रिक बसची भेट! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, आरामदायी व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करण्यात आलेल्या ३४ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या बससेवेसह महानगरपालिकेच्या विविध विकासप्रकल्पांच्या लोकार्पण शिलाफलकांचे अनावरण करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., महापौर समीर राजूरकर, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


शहरवासीयांना आधुनिक व पर्यावरणपूरक बससेवा


महानगरपालिकेच्या शहर बससेवेत नव्याने समाविष्ट झालेल्या या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी व सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. सोमवार, दि. २ नोव्हेंबरपासून या बस प्रवासी सेवेत दाखल होणार असून शहरातील विविध मार्गांवर त्यांचे संचालन करण्यात येणार आहे. या बस नऊ मीटर लांबीच्या असून प्रत्येकी ३२ प्रवासी आसनांची व्यवस्था आहे. जीपीएस आधारित बस ट्रॅकिंग, डिजिटल तिकीट प्रणाली, आधुनिक ब्रेकिंग यंत्रणा व जलद चार्जिंग यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिक बसमुळे इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यासह शहरातील वायुप्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे. महानगरपालिकेने पीएम ई-बस योजनेअंतर्गत आणखी १०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार होण्यास मदत होणार आहे.



ई-व्ही चार्जिंग स्टेशन व सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण


इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कॅनॉट गार्डन व बाबा पेट्रोल पंपाजवळील भगवान महावीर उड्डाणपुलाखाली ई-व्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पांचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शहरात भविष्यात आणखी दहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन विकसित करण्याचे नियोजन आहे. तसेच सिद्धार्थ उद्यान वाहनतळावर १०० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे वीजबचतीसह स्वच्छ ऊर्जेच्या वापराला चालना मिळणार आहे. महानगरपालिकेच्या मिटमिटा येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पणही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.


देवगिरी व्हॅली परिसरात उभारण्यात आलेल्या या शाळेत २४ वर्गखोल्या, ग्रंथालय, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण सुविधा, स्मार्ट वर्गखोल्या व क्रीडांगण उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा या इमारतीत निर्माण करण्यात आल्या आहेत. मे. तापडिया कन्स्ट्रक्शन यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शाळेचे बांधकाम पूर्ण केले आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५९ लाख १४ हजार रुपयांचा धनादेश या कार्यक्रमात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५९ लाख १४ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. महापौर समीर राजूरकर व महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. शहरातील सार्वजनिक वाहतूक, स्वच्छ ऊर्जा व शिक्षण क्षेत्रातील या प्रकल्पांमुळे नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होण्यासह पर्यावरणपूरक व शाश्वत शहरी विकासाला चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

केंद्र सरकारकडून राज्यांना दिवाळी भेट; महाराष्ट्राच्या वाट्याला 7 हजार कोटी!

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं देशातील सर्व राज्यांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. दिवाळीच्या आधी केंद्र सरकारने सर्व

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट! 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट; मुंबईत काय स्थिती?

मुंबई : ऑक्टोबर महिना संपताच नोव्हेंबरच्या सुरुवातीलाही महाराष्ट्रातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे.

1 नोव्हेंबरपासून राज्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’, आरोग्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार...

मुंबई: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक

Ladki Bahin Yojana : 1500 की 3000 ? लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर

Latur Blast : लातूरमध्ये कुरिअरच्या टेम्पोत भीषण स्फोट; एक जण गंभीर जखमी, वाहनात बंदूक आढळल्याने खळबळ

Latur News: लातूर शहरात कुरिअरची पार्सल घेऊन आलेल्या एका टेम्पोमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. कुरिअरचे

त्र्यंबकेश्वर कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ धार्मिक विधींना प्रारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडत आहे.