
उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. देवास रोडवरील एका हॉटेलमध्ये अन्नकचरा साठवण्यासाठी असलेल्या भूमिगत टाकीची स्वच्छता करताना विषारी वायूची बाधा होऊन 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. टाकीच्या स्वच्छतेसाठी आत उतरलेल्या कर्मचाऱ्यांना विषारी वायूचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उज्जैनचे जिल्हाधिकारी रोशन कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमधील अन्नकचरा साठवण्याच्या टाकीची स्वच्छता करण्यासाठी सुरुवातीला 2 व्यक्ती आत उतरल्या होत्या. मात्र, काही वेळानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांना वाचवण्यासाठी आणखी 2 व्यक्ती टाकीत उतरल्या. मात्र, त्यांनाही विषारी वायूची बाधा झाली. या दुर्घटनेत एकूण 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
विषारी वायूमुळे गुदमरले कर्मचारी
उज्जैनचे पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, हॉटेलमधील अन्नाचे उरलेले पदार्थ आणि कचरा जमा करण्यासाठी असलेल्या चेंबरमध्ये कर्मचारी आणि काही खासगी व्यक्ती स्वच्छतेसाठी उतरल्या होत्या. या ठिकाणी गॅस गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे चेंबरमधील पृष्ठभाग निसरडा झाला आणि आत गेलेल्या व्यक्ती कोसळल्या. त्यांना वाचवण्यासाठी आत गेलेल्या इतर व्यक्तींनाही याचा फटका बसला.
Murasu Cyclone: बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती होत असून, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट घोंगावत आहे. भारतीय ...
बचावकार्यादरम्यान CPR देण्याचे प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या व्यक्तींना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळीच CPR देऊन त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. रुग्णालयात वैद्यकीय पथकही सज्ज ठेवण्यात आले होते. दरम्यान, जिल्हाधिकारी रोशन कुमार सिंह यांनी या दुर्घटनेमागील नेमकी कारणे आणि घटनाक्रम समजून घेण्यासाठी अधिक माहिती गोळा केली जात असल्याचे सांगितले. टाकीत कोणत्या प्रकारचा विषारी वायू तयार झाला होता आणि गळती नेमकी कशामुळे झाली, याचा तपास केला जाणार आहे. या घटनेमुळे हॉटेलमधील स्वच्छता आणि बंदिस्त टाक्यांमध्ये काम करताना घ्यावयाच्या सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




