Sunday, November 1, 2026

पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्षात अमेरिकेची एन्ट्री; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओंच्या विधानाने खळबळ

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमावादात अमेरिकेची महत्त्वाची प्रतिक्रिया! परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी अफगाणिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांबाबत पाकिस्तानच्या चिंतेचा उल्लेख केला. दरम्यान, दोन्ही देशांकडून सीमावर्ती हल्ल्यांचे परस्पर आरोप केले जात आहेत.

वॉशिंग्टन : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावाद आणि दहशतवादी हल्ल्यांवरून तणाव वाढत असतानाच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. अफगाणिस्तानच्या भूमीतून पाकिस्तानवर दहशतवादी हल्ले होत असल्याबद्दल इस्लामाबादने चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानला दहशतवादाचे लक्ष्य बनवले जावे, अशी अमेरिकेची इच्छा नसल्याचे रुबिओ यांनी स्पष्ट केले. अटलांटा येथे झालेल्या G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान त्यांनी ही भूमिका मांडली. रुबिओ म्हणाले की, पाकिस्तानला अफगाणिस्तानच्या भूमीतून प्रायोजित होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांची चिंता आहे. तालिबान सरकार या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. या परिस्थितीवर पाकिस्तानने स्वतःची भूमिका घेत कारवाईही केली आहे, असे त्यांनी नमूद केले.

पाकिस्तानकडून अफगाणिस्तानच्या सीमावर्ती ठिकाणांवर हल्ले

दरम्यान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. पाकिस्तानच्या सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार, 27 ऑक्टोबर रोजी दक्षिण वझिरीस्तानमधील अंगूर अड्डा परिसरात अफगाण तालिबान सैन्याने गोळीबार केला. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी सैन्याने अफगाण तालिबानच्या सीमावर्ती चौक्या, संरक्षण बंकर आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. या कारवाईत तालिबानचे काही जवान मारले गेल्याचा आणि अनेकांनी आपली ठिकाणे सोडल्याचा दावा पाकिस्तानच्या सरकारी माध्यमांनी केला आहे. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. या संघर्षात काही नागरिकांचा मृत्यू झाल्याचे आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याचेही वृत्त आहे.

अफगाणिस्तानचाही पाकिस्तानवर गंभीर आरोप

दुसरीकडे, अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानवरच हल्ला सुरू केल्याचा आरोप केला आहे. 28 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या निवेदनात पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या बक्तिका प्रांतातील अंगूर अड्डा बाजार आणि एका कमिशनला लक्ष्य करून 4 ड्रोन हल्ले केल्याचा दावा करण्यात आला. याला प्रत्युत्तर म्हणून अफगाण सैन्याने पाकिस्तानी लष्करी मुख्यालय आणि आसपासच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचे अफगाणिस्तानने म्हटले आहे.

पाकिस्तान-अफगाणिस्तान संबंध का बिघडले?

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावाचे प्रमुख कारण म्हणजे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ही दहशतवादी संघटना. अफगाणिस्तानातील तालिबान सरकार TTP ला आश्रय देत असून, अफगाण भूमीचा वापर पाकिस्तानमध्ये हल्ले घडवण्यासाठी केला जात असल्याचा इस्लामाबादचा आरोप आहे. मात्र, अफगाण तालिबानने हे आरोप फेटाळले आहेत. सीमेवरील चकमकी, ड्रोन हल्ले आणि परस्पर आरोपांमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक तणावपूर्ण बनले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या भूमिकेकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >