Monday, November 2, 2026

रशिया आणि युक्रेनच्या आपत्कालीन यंत्रणांवर मोठा सायबर हल्ला; नागरिकांमध्ये किरणोत्सर्गाच्या खोट्या सूचनेने खळबळ

रशिया आणि युक्रेनच्या आपत्कालीन यंत्रणांवर मोठ्या सायबर हल्ल्याची घटना समोर आली आहे. नागरिकांना किरणोत्सर्गाची खोटी आपत्कालीन सूचना पाठवण्यात आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. या सायबर हल्ल्यामुळे डिजिटल सुरक्षा आणि आपत्कालीन यंत्रणांच्या विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कीव: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले असून, आता या युद्धाने सायबर विश्वातही गंभीर वळण घेतले आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या प्रमुख आपत्कालीन आणि इशारा यंत्रणांवर मोठे सायबर हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या सूचना प्रसारित केल्या गेल्या.

युक्रेनच्या 'एअर रेड अलर्ट' यंत्रणेत घुसखोरी

युक्रेनमध्ये हॅकर्सनी थेट देशाच्या ‘एअर रेड अलर्ट सिस्टिम’मध्ये घुसखोरी केली. यामुळे संपूर्ण देशातील नागरिकांच्या मोबाईलवर रासायनिक आणि किरणोत्सर्गाच्या कथित धोक्याबाबत खोटे संदेश पाठवण्यात आले. एवढेच नव्हे, तर रस्त्यांवर लादलेल्या ध्वनिक्षेपकांद्वारे इशारे देणाऱ्या यंत्रणेशीही छेडछाड करण्यात आली, ज्यामुळे कीवसह विविध शहरांच्या रस्त्यांवर खोटे संदेश प्रसारित झाले. या प्रकारानंतर युक्रेनच्या हवाई दलाने तातडीने स्पष्टीकरण देत हा बाहेरील घटकांचा हस्तक्षेप असल्याचा संशय व्यक्त केला. नागरिकांना किरणोत्सर्गाचा कोणताही धोका नसून कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन अधिकृतपणे करण्यात आले. तसेच युक्रेनच्या डिजिटल परिवर्तन मंत्रालयाने स्पष्ट केले की, त्यांची देशव्यापी इशारा यंत्रणा सामान्यपणे आणि सुरळीतपणे कार्यरत आहे.

रशियाच्या मोबाईल ॲपवरही सायबर प्रहार

युक्रेनपाठोपाठ रशियाच्या आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयाच्या मोबाईल ॲप्लिकेशनवरही एक मोठा सायबर हल्ला झाला. या हल्ल्यामुळे रशियन नागरिकांमध्ये संभाव्य धोक्यांबाबत आणि आपत्कालीन परिस्थितीविषयी चुकीची माहिती पसरली. रशियन मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, हल्लेखोरांनी ॲपचा गैरवापर करत नागरिकांमध्ये खोटी माहिती पसरवली. सध्या या ॲपमधील तांत्रिक त्रुटी दूर करून यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रशियन प्रशासनाने स्पष्ट केले की, ही मोबाईल ॲप सेवा केवळ एक अतिरिक्त माध्यम असून यामुळे मुख्य सार्वजनिक सुरक्षा यंत्रणेवर कोणताही परिणाम झालेला नाही.

झेलेन्स्की यांची युद्धविरामाची मागणी

एकीकडे सायबर हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असताना, दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ऊर्जा क्षेत्रातील युद्धविरामाची मागणी केली आहे. सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक ऊर्जा बाजारातील किमतींवर मोठा परिणाम होत असल्याचा मुद्दा मांडत त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. राजनैतिक आणि मानवतावादी पातळीवर प्रयत्न सुरू असताना घडलेल्या या सायबर हल्ल्यांच्या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >