Monday, November 2, 2026

Nashik : नाशिक रोड रेल्वे स्थानकावर 'या' तारखेपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट बंद

नाशिक : दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवरील वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नाशिक रोड रेल्वे स्थानकावर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा त्यांना घेण्यासाठी स्थानकावर येणाऱ्या नागरिकांना या काळात प्लॅटफॉर्मवर प्रवेशासाठी तिकीट मिळणार नाही. दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त मोठ्या संख्येने नागरिक रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्याही चालवण्यात येत आहेत. परिणामी नाशिक रोडसह प्रमुख रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

प्रवाशांसोबत येणारे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्यामुळे फलाटांवर अनावश्यक गर्दी वाढते. याचा परिणाम प्रवाशांच्या हालचाली, रेल्वे गाड्यांमधील चढ-उतार आणि स्थानकातील व्यवस्थापनावर होतो. ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी भुसावळ रेल्वे विभागाने प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत.

ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय कारणांसाठी सूट

प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवरील बंदी १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान लागू राहणार असली, तरी काही प्रवाशांना यातून सवलत देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक तसेच वैद्यकीय कारणांमुळे स्थानकावर येणे आवश्यक असलेल्या व्यक्तींना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींना आवश्यकतेनुसार प्लॅटफॉर्मवर जाण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

रेल्वे प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

सणासुदीच्या काळात स्थानकावरील गर्दी कमी ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी शक्यतो रेल्वे स्थानकाबाहेरच थांबावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. प्रवाशांची सुरक्षितता, फलाटांवरील गर्दीचे नियंत्रण आणि स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत नाशिक रोड रेल्वे स्थानकावर जाण्यापूर्वी नागरिकांनी या निर्बंधांची नोंद घ्यावी आणि त्यानुसार नियोजन करावे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >