Monday, November 2, 2026

Mahadev App : महादेव ॲप सट्टेबाजी प्रकरणातील सौरभ चंद्रकर ओमानमधून भारतात; सीबीआयने केली प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण

आता त्याला रायपूर येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Crime News: महादेव ऑनलाइन सट्टेबाजी ॲप प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या सौरभ चंद्रकर याला सीबीआयने ओमानमधून भारतात आणले आहे. केंद्रीय यंत्रणांच्या समन्वयातून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर सीबीआयच्या विशेष पथकाने त्याला भारतात आणले. आता त्याला रायपूर येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सौरभ चंद्रकर हा सीबीआयच्या दोन प्रकरणांमध्ये आरोपी आहे. या प्रकरणांमध्ये यापूर्वीच आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. तसेच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील त्याच्याशी संबंधित एका प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. भारतात आणल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर ट्रान्झिट रिमांड मिळाल्यावर त्याला रायपूर येथे नेण्यात येणार आहे.

 

देशभरात पसरले होते सट्टेबाजीचे नेटवर्क

छत्तीसगड सरकारच्या विनंतीनंतर सीबीआयने महादेव ऑनलाइन बुक प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. तपासानुसार, महादेव ऑनलाइन बुक हे भारताबाहेरून चालवले जाणारे मोठे अवैध ऑनलाइन सट्टेबाजीचे नेटवर्क होते. या माध्यमातून क्रिकेट, फुटबॉल, पत्त्यांचे खेळ आणि अन्य कार्यक्रमांवर सट्टा लावण्याची सुविधा दिली जात होती.

या नेटवर्कचे कामकाज चालवण्यासाठी देशातील विविध भागांत 'पॅनेल' आणि 'शाखां'चे जाळे उभारण्यात आले होते. या माध्यमातून लोकांची भरती करणे आणि सट्टेबाजीमधून मिळणारी रक्कम गोळा करणे अशी कामे केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

हवाला मार्गाने परदेशात पाठवला जात होता पैसा

सीबीआयच्या तपासानुसार, सट्टेबाजीमधून मिळणारी रक्कम अनेक बँक खात्यांमधून वळवली जात होती. अनेक व्यवहारांनंतर हा पैसा हवाला मार्गाने परदेशात पाठवला जात असल्याचा आरोप आहे.

तसेच सट्टेबाजीचे नेटवर्क सुरळीत चालवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना कथितरीत्या संरक्षण शुल्क दिले जात असल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988, भारतीय दंड संहितेतील गुन्हेगारी कट, फसवणूक आणि बनावटगिरीशी संबंधित तरतुदी तसेच छत्तीसगड जुगार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत.

रेड कॉर्नर नोटीसनंतर ओमानमध्ये अटक

सौरभ चंद्रकर याच्याविरोधात इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. या नोटिशीच्या आधारे ओमान पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर सीबीआय आणि ईडीने त्याच्याविरोधातील पुराव्यांसह ओमानकडे प्रत्यार्पणासाठी प्रस्ताव पाठवले.

भारत सरकारच्या संबंधित यंत्रणा आणि इंटरपोलच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरो यांच्या समन्वयातून प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर सीबीआयचे पथक मस्कतमध्ये दाखल झाले आणि सौरभ चंद्रकर याला भारतात घेऊन आले. या प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल सीबीआयने ओमान सरकार आणि रॉयल ओमान पोलिसांचे आभार मानले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >