
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआरमधील रहिवाशांना दिवाळीत फटाक्यांच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. सोमवारी ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी, म्हणजेच दिवाळीच्या आदल्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी हरित फटाके (Green Crackers) वापरण्यास परवानगी दिली आहे. नागरिकांना सकाळी आणि सायंकाळी ठराविक वेळेत हे फटाके फोडण्याची मुभा देण्यात आली आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने दोन्ही दिवशी सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० या वेळेत हरित फटाके फोडण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान दिल्ली एनसीआरमध्ये ९ नोव्हेंबरपासून फटाक्यांवर संपूर्ण बंदी पुन्हा लागू केली जाईल. दिल्ली एनसीआरमधील वायू प्रदूषणाची परिस्थिती आणि दिवाळीतील परंपरा यांच्यात संतुलन साधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ही सूट दिली आहे.
२९ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या आदेशात न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न बा. वराळ यांच्या खंडपीठाने मर्यादित कालावधीसाठी केवळ प्रमाणित हरित फटाक्यांच्या उत्पादन, विक्री आणि वापरास परवानगी दिली आहे. रुग्णालये, नर्सिंग होम, आरोग्य केंद्रे, वृद्धाश्रम, शैक्षणिक संस्था आणि अधिसूचित शांतता क्षेत्रांच्या ३०० मीटर परिसरात फटाक्यांवर बंदी असेल. हे क्षेत्र फटाके मुक्त क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल.
देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र (Road Safety Training and Research Institute) सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे येथे उभारण्यात येत असून, या महत्त्वाकांक्षी ...
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, केवळ CSIR- NEERI प्रमाणित आणि PESO मान्यताप्राप्त हरित फटाक्यांच्या उत्पादनास परवानगी दिली जाईल. यांचे उत्पादन २ ते ६ नोव्हेंबर दरम्यान केले जाईल. प्रत्येक पॅकेजवर उत्पादन आणि बॅचसाठी विशिष्ट असा QR कोड असणे अनिवार्य असेल. यामध्ये उत्पादक, नोंदणी आणि चाचणी प्रमाणपत्रांविषयी माहिती असेल. बेरियममुक्त फटाके, माळा आणि पारंपरिक फटाक्यांची विक्री व वापर प्रतिबंधित राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक आणि व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आणि त्यांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हरित फटाके म्हणजे काय?
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, केवळ प्रमाणित हरित फटाक्यांनाच परवानगी दिली जाईल. नेहमीच्या फटाक्यांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही. हरित फटाके हे पारंपरिक फटाक्यांपेक्षा कमी प्रदूषण निर्माण करण्यासाठी बनवलेले असतात. त्यात हानिकारक रसायनांचा वापर कमी किंवा प्रतिबंधित केला जातो. तथापि, हरित फटाक्यांमुळेही प्रदूषण होते. त्यामुळे त्यांचा वापर काही विशिष्ट अटींच्या अधीन आहे.






