Monday, November 2, 2026

Punjab Politics : पंजाबमध्ये 'आप'ला मोठा हादरा; एकाच दिवशी ३ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, भगवंत मान सरकारपुढील अडचणी वाढल्या

कुंवर विजय प्रताप सिंग, हरमीत सिंग पठाणमाजरा आणि चेतन सिंग जोरामजरा या तीन बड्या नेत्यांचा समावेश आहे. निवडणुका तोंडावर असताना एकाच दिवशी तीन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे.

चंदीगड : पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आम आदमी पक्षाच्या (AAP) तीन बंडखोर आमदारांनी सोमवारी दिल्लीत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. यामध्ये कुंवर विजय प्रताप सिंग, हरमीत सिंग पठाणमाजरा आणि चेतन सिंग जोरामजरा या तीन बड्या नेत्यांचा समावेश आहे. निवडणुका तोंडावर असताना एकाच दिवशी तीन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे.

">पक्षाचा राजीनामा अन् थेट भाजप मुख्यालयात प्रवेश

हा संपूर्ण घटनाक्रम अत्यंत वेगाने घडला. अमृतसर उत्तरचे आमदार आणि माजी आयपीएस अधिकारी कुंवर विजय प्रताप सिंग यांनी सोमवारी सकाळीच पक्षाचा व आमदारकीचा राजीनामा दिला. तर हरमीत सिंग पठाणमाजरा आणि माजी मंत्री चेतन सिंग जोरामजरा यांनी रविवारीच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. सोमवारी सकाळी हे तिन्ही नेते दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आणि 'भाजपा जिंदाबाद'च्या घोषणा देत अधिकृतपणे भाजपचा गमछा परिधान केला.

उमेदवारी न मिळाल्याने पक्षाला जय महाराष्ट्र!

'आप'ने आगामी २०२७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाने अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली, परंतु पठाणमाजरा आणि जोरामजरा या दोघांची नावे त्यातून गायब होती. एवढेच नाही तर पक्षाने त्यांच्या मतदारसंघात नवीन प्रभारींची नियुक्ती केली होती. पक्षाकडून पुन्हा तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट होताच दोन्ही नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. पठाणमाजरा यांनी थेट अरविंद केजरीवाल यांच्याकडे राजीनामा पाठवला. तर समाना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे व मान सरकारमध्ये माजी कॅबिनेट मंत्री राहिलेल्या चेतन सिंग जोरामजरा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून पक्षातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. "माझे मन आता या पक्षात उरलेले नाही आणि पंजाबची सध्याची स्थिती अत्यंत हृदयद्रावक आहे," अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली.

'पंजाबच्या विकासासाठी भाजप हाच योग्य पर्याय'

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हरमीत सिंग पठाणमाजरा यांनी आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली. आगामी २०२७ ची विधानसभा निवडणूक ते सणौर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढण्यास उत्सुक आहेत. भाजप हा एक मजबूत राष्ट्रीय पक्ष असून पंजाबच्या प्रगतीसाठी आणि हितासाठी भाजपसोबत काम करणेच योग्य ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भगवंत मान सरकारवर सडकून टीका

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी या बंडखोर नेत्यांनी पंजाबमधील भगवंत मान सरकारवर गंभीर आरोप केले. राज्यातील वाढती ड्रग्जची समस्या, कायदा व सुव्यवस्थेचा बिघडलेला दर्जा, भ्रष्टाचार, राज्यावर वाढणारे कर्जाचे डोंगर आणि शेतकरी, शिक्षण व आरोग्याशी संबंधित दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेले अपयश या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पठाणमाजरा यांनी यापूर्वीही मतदारसंघातील पूरपरिस्थितीच्या व्यवस्थापनावरून स्वपक्षीय सरकारवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

२०२७ च्या निवडणुकीपूर्वी 'आप'समोर मोठे आव्हान

विधानसभा निवडणुका जवळ येत असताना सत्ताधारी आम आदमी पक्षात सुरू झालेली अंतर्गत गटबाजी आणि आमदारांची बंडखोरी यामुळे पक्ष नेतृत्वाची चिंता वाढली आहे. एकीकडे 'आप'ला आपली सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि भाजप पंजाबमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >