PuneMetroExpansion: 'पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे शहराच्या विकासाला नवी गती'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

देशातील मेट्रोचे जाळे १२०० किलोमीटरवर; २६ शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू

मुंबई(सुहास शेलार ) : "पुणे शहराच्या विकासाला आणि शहरातील वाहतुकीला पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे नवी गती मिळणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे पुण्यातील मोठ्या आयटी क्षेत्राला अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच शहरातील जुन्या आणि नव्या भागांमधील संपर्क अधिक मजबूत होईल", असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केला.(PUNE METRO EXPANSION)


‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका-3 ’चे उद्घाटन आणि ‘पुणे मेट्रो टप्पा-2 ’च्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी चिंचवड महापौर रवी लांडगे, खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.


पुणे हे आयटी, ऑटोमोबाईल, फार्मा, स्टार्टअप, नवोपक्रम आणि उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असून, मेट्रोच्या वाढत्या सुविधांमुळे शहराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असे नमूद करून प्रधानमंत्री म्हणाले, देशात 2014 मध्ये केवळ 248 किलोमीटरचे मेट्रो मार्ग कार्यरत होते. आज हे जाळे सुमारे 1200 किलोमीटरपर्यंत विस्तारले असून, 26 शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू आहे. दररोज एक कोटीहून अधिक प्रवासी मेट्रोने प्रवास करीत आहेत. भारतीय मेट्रो नेटवर्क जगातील पहिल्या तीन मोठ्या मेट्रो नेटवर्कमध्ये गणले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.


महाराष्ट्रात 2014 मध्ये केवळ 10 ते 11 किलोमीटर मेट्रो मार्ग सुरू होता. आज सुमारे 200 किलोमीटर मेट्रो मार्ग सेवेत असून, 680 किलोमीटरहून अधिक मार्गांची कामे सुरू आहेत. राज्यात मेट्रो पायाभूत सुविधांवर अडीच लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली असल्याचे श्री. मोदी म्हणाले.(URBAN DEVELOPMENT)


मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ वाचतो, शहराची उत्पादकता वाढते आणि त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते. पुणे मेट्रोचा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर उभारण्यात आला असून, सरकार आणि खासगी क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांतून विकासाची नवी संधी निर्माण होत आहे. शहरांची स्पर्धात्मकता आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


देशातील शहरांना विकासाची केंद्रे बनविण्यासाठी केंद्र सरकारने एक लाख कोटी रुपयांच्या अर्बन चॅलेंज फंडला मंजुरी दिली आहे. या माध्यमातून आगामी काळात शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होणार आहे. तसेच गेल्या 10 ते 12 वर्षांत 50 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर पडण्यास यश आल्याचा उल्लेख जागतिक बँकेच्या अहवालाच्या संदर्भाने त्यांनी केला. पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, विमानतळ, मेट्रो, वीज, पाणी आणि गॅस पाइपलाइनमधील गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधी वाढत असल्याचे प्रधानमंत्री मोदी म्हणाले.


महाराष्ट्रातील प्रतिकूल हवामानामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र आणि राज्य सरकार संवेदनशीलतेने उभे असल्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी काळजी करू नये, संकटाच्या काळात सरकार त्यांना मदत करेल. दिवाळीच्या सणात दुष्काळग्रस्त आणि संकटात असलेल्या शेतकरी कुटुंबांचाही विचार करून त्यांच्या घरातही सणाचा आनंद निर्माण होण्यासाठी सर्वांनी सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.(CITY PROGRESS)




2030 पर्यंत 'पीएमआर' क्षेत्र मोबिलिटी केंद्र बनेल - मुख्यमंत्री


पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश (पीएमआर) परिसरात मेट्रो, इलेक्ट्रिक बस, इनर रिंगरोड, आउटर रिंगरोड, बोगदे आणि नव्या विमानतळासह आधुनिक वाहतूक सुविधांचे जाळे उभारण्यात येत आहे. या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून 2030 पर्यंत पुणे महानगर प्रदेश देशातील महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.



हिंजवडी आणि परिसर हा देशातील महत्त्वाचा आयटी हब आहे. या परिसरात दररोज हजारो कर्मचारी कामासाठी येतात. वाहतूक कोंडीमुळे त्यांना अनेकदा एक ते दोन तास अडकून पडावे लागते. मेट्रो सुरू झाल्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचारी, विशेषतः तरुण- तरुणींना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन 2018 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्याच हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होत असल्याचा आनंद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.



देशात सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) मेट्रो प्रकल्प उभारण्याच्या धोरणानंतर शिवाजीनगर-हिंजवडी हा पहिला प्रकल्प ठरला. डीबीओटी तत्त्वावर टाटा प्रोजेक्ट्स आणि सीमेन्स यांनी या प्रकल्पाची उभारणी केली. केंद्र व राज्य सरकारचे सहकार्य, व्यवहार्यता तफावत निधी आणि महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेले जमीन संपादन यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास आला. या प्रकल्पाच्या उभारणीपासून संचालनापर्यंत महिलांचे योगदान महत्त्वाचे असून ही 'पिंक पॉवर्ड' मेट्रो महिला शक्तीच्या सहभागाचे प्रतीक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.(PUNE GROWING)




राज्यातील 12 महापालिका क्षेत्रांत मेट्रो


पुणे शहरात सुमारे 120 किलोमीटरचे मेट्रो मार्ग तयार झाले असून काही मार्गांची कामे सुरू आहेत. देशातील मेट्रो विस्ताराचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला झाला आहे. राज्यातील 12 महापालिका क्षेत्रांत मेट्रो सुरू आहे किंवा तिचे काम सुरू आहे. मेट्रो ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून आर्थिक विकासाला चालना देणारी यंत्रणा आहे. मेट्रोमुळे गुंतवणूक, रोजगार आणि त्याभोवतीचे आर्थिक परिसंस्थेचे जाळे विकसित होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.



पुणे महानगर प्रदेशाला मोठे शहरी विकास केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या माध्यमातून पुणे आणि पीएमआर परिसरात आधुनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन आहे. पुणे मेट्रो ही ग्रीन मेट्रो म्हणून विकसित होत असून आवश्यक ऊर्जेपैकी 30 टक्के ऊर्जा स्वतः निर्माण करणार आहे. पुणे परिसरात मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस, इनर व आउटर रिंगरोड, सीएमटीआर, भूमिगत मार्ग आणि बोगद्यांचे जाळे विकसित होत आहे. यामुळे पुणे केवळ आयटी आणि उत्पादन क्षेत्राचेच नव्हे, तर फ्रंटियर टेक्नॉलॉजीचेही महत्त्वाचे केंद्र बनेल. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात पुण्याचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.



देशात पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच गरिबी निर्मूलन आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे. विकासाच्या प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिक आणि समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य आणि मार्गदर्शन कायम मिळत राहील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.



पुणे मेट्रो मार्गिका-3 ची वैशिष्ट्ये


पुणे मेट्रो मार्गिका-3 (पुणेरी मेट्रो) ही माण-हिंजवडी ते शिवाजीनगर अशी 23.203 किलोमीटर लांबीची मार्गिका असून या मार्गावर एकूण 23 उन्नत स्थानके आहेत. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी-डीबीएफओटी) तत्त्वावर विकसित करण्यात आलेला हा देशातील पहिला मेट्रो प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी 8 हजार 313 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.(SMART CITY PUNE)



महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देणारी ही ‘पिंक मेट्रो’ असून या मार्गावर 90 महिला चालक मेट्रो चालविणार आहेत. तसेच प्रकल्पाच्या एकूण मनुष्यबळापैकी 50 टक्के कर्मचारी महिला असणार आहेत. हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला शिवाजीनगरशी थेट जोडणाऱ्या या मेट्रोमुळे हजारो आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि प्रवाशांना जलद, सुरक्षित व सुविधाजनक प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

Comments
Add Comment

Sanjay Shirsat On Dia Mirza : "दिया मिर्झाने आधी भोंग्यांवर बोलून दाखवावे आणि मग...दिया मिर्झाच्या व्हिडिओवर मंत्री संजय शिरसाट आक्रमक; 'हिंदूंच्याच सणांवर निर्बंध का?' असा थेट सवाल

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पर्यावरणाचे रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणासाठी अभिनेत्री

SBI : एसबीआयचा दुसऱ्या तिमाहीत नफा 14 टक्क्यांनी वाढला

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने जुलै-सप्टेंबर २०२६ या आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर

NDRF Relief Fund 2026: जिरायती शेतीसाठी आता प्रतिहेक्टरी ११ हजार रुपये; मृतांच्या कुटुंबीयांना आठ लाख, फळबागांच्या नुकसानीसाठी ३० हजार रुपये

मुंबई (सुहास शेलार): दुष्काळ, अतिवृष्टी आणि अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांना

Innovation Challenge: ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ला १ लाखांहून अधिक युवकांचा प्रतिसाद

मुंबई(सुहास शेलार) : युवकांच्या नवकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा

Nepal Helicopter Crash: नेपाळमध्ये लँडिंगदरम्यान दोन हेलिकॉप्टरची धडक; एक भारतीय ठार

नेपाळच्या सोलुखुम्बु जिल्ह्यातील फेरिचे हेलिपॅडवर उतरताना दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळल्याने एका भारतीय

Mumbai BEST Bus Update : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! बेस्टच्या ताफ्यात ४४ नव्या एसी इलेक्ट्रिक बसेस दाखल; शहरात ५ नव्या मार्गांवर धावणार

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्यासाठी बृहन्मुंबई विद्युत