नवी दिल्ली : दिवाळी आली की, प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना काय भेटवस्तू (दिवाळी गिफ्ट) देणार याची मोठी उत्सुकता असते. गेल्या वर्षी सोशल मीडियावर एका कंपनीच्या दिवाळी गिफ्टने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना हिरव्या रंगाच्या आकर्षक सुटकेस (बॅग्ज) गिफ्ट दिल्या होत्या, ज्यांचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल झाले होते. 'नौकरी डॉट कॉम' (Naukri.com) चालवणाऱ्या 'इन्फोएज' (Info Edge) या कंपनीचे ते गिफ्ट होते. आता यंदाची दिवाळी जवळ आल्यावर पुन्हा एकदा तीच कंपनी आणि तोच विषय चर्चेत आला आहे; लोकांना हेच जाणून घ्यायचे आहे की, यंदा त्या हिरव्या सुटकेस देणाऱ्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना नेमकं काय भारी गिफ्ट दिलंय!
यंदा सुटकेस नाही, तर आरोग्याची काळजी!
सध्या सोशल मीडियावर या कंपनीच्या गिफ्टचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यावरून असे समजले आहे की, यंदा कंपनीने गेल्या वर्षीसारख्या सुटकेस देण्याऐवजी कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीला प्राधान्य दिले आहे. यंदा कंपनीने प्रत्येकाला ५ ताजे सफरचंद दिले आहेत, ज्याच्या माध्यमातून 'रोज एक सफरचंद खा आणि निरोगी राहा' असा छान संदेश देण्यात आला आहे.
गिफ्ट बॉक्समध्ये आणखी काय-काय आहे ?
फक्त फळेच नव्हे, तर कंपनीने कर्मचाऱ्यांच्या उपयोगाला येईल अशी एक स्टीम प्रेस (इस्त्री) देखील दिली आहे. याशिवाय खाण्यापिण्याच्या चवदार पदार्थांनी भरलेले दोन वेगळे बॉक्स देखील या दिवाळी हॅम्परचा भाग आहेत. कंपनीच्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांच्या डेस्कवर हे सर्व गिफ्ट्स थाटात सजवून ठेवण्यात आले होते. अनेक कर्मचाऱ्यांनी हे गिफ्ट उघडतानाचे आणि त्यातील वस्तू दाखवणारे मजेशीर रील्स बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
सोशल मीडियावर जोरदार चर्चा आणि मजेशीर प्रतिक्रिया
कर्मचाऱ्यांचे हे व्हिडिओ इंटरनेटवर येताच ते खूप पाहिला गेले आहेत. लोक या कंपनीच्या हटके आणि उपयोगाच्या आयडियाचे भरभरून कौतुक करत आहेत. दुसरीकडे, ज्या बिचाऱ्या कर्मचारांना त्यांच्या ऑफिसकडून चांगले गिफ्ट मिळाले नाही किंवा काहीच मिळाले नाही, ते युझर्स या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स करून आपली जळजळ आणि खंत व्यक्त करताना दिसत आहेत!