Tuesday, November 3, 2026

Ahilyanagar Crime: अळकुटी येथे ७० लाखांची चोरी, दागिन्यांसह रोख रक्कम लांबवली; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील घोलप मळ्यात यशवंत बाळाजी घोलप यांच्या बंद घराची कडी काढून चोरट्यांनी तब्बल ३१ तोळे सोने, ५० तोळे चांदी आणि रोख रक्कम असा मिळून जवळपास ७० लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल लांबवल्याची मोठी घटना घडली आहे.

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील घोलप मळ्यात यशवंत बाळाजी घोलप यांच्या बंद घराची कडी काढून चोरट्यांनी तब्बल ३१ तोळे सोने, ५० तोळे चांदी आणि रोख रक्कम असा मिळून जवळपास ७० लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल लांबवल्याची मोठी घटना घडली आहे. या चोरीमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी मध्यरात्री बारा ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली. प्रशांत घोलप यांनी ही माहिती दिली असून, याप्रकरणी मंगल घोलप यांनी पारनेर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच पारनेर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी सोमवारी (दि.२) सायंकाळी सहा वाजता घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व ठसे तज्ज्ञांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी परिसराची पाहणी करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर काही संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत. यशवंत घोलप यांच्या घरामध्ये दोन ते तीन खोल्या असून, चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश केला. ज्या खोलीमध्ये कपाट ठेवण्यात आले होते, त्याच खोलीमध्ये अवघ्या आठ दिवसांपूर्वी काढलेले सोयाबीन साठवून ठेवण्यात आले होते. या खोलीत त्या रात्री कोणीही झोपले नव्हते. चोरट्यांनी नेमकी हीच संधी साधून या खोलीतील कपाटाचे लॉक तोडले आणि आतील ऐवज व रोख रक्कम लंपास केली. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमुळे मोठा पोलीस बंदोबस्त व्यस्त असल्याने पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. तत्पूर्वी, ठसेतज्ज्ञ व गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी दुपारी तीन वाजताच येऊन त्यांनी प्राथमिक तपास पूर्ण केला होता. या गुन्ह्याबाबत काही महत्त्वपूर्ण धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, चोरीला गेलेले सोन्याचे दागिने प्रत्यक्षात ३१ तोळे होते; परंतु काही दागिन्यांची बिले उपलब्ध नसल्यामुळे फिर्यादीमध्ये २१ तोळे सोन्याची नोंद करण्यात आली आहे. या शिवाय मोठ्या प्रमाणावर चांदीचे दागिनेही चोरीला गेले आहेत. विशेष म्हणजे, ज्या कपाटातील ऐवज चोरीला गेला त्याच्या शेजारील ड्रॉवरमध्येही मोठी रक्कम पडून होती, जी सुरक्षित राहिली. यामुळे चोरट्यांना घरातील रचनेची आणि दागिन्यांच्या स्थानाची खडानखडा माहिती होती, हे दिसून येते. चोरटे मागच्या दाराने बिनचप्पल बाहेर पडल्याचे निदर्शनास आले असून, हे माहितगार व्यक्तींचेच कृत्य असण्याची दाट शक्यता ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >