WhatsApp : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवे ‘स्मार्ट टेक्स्ट ॲक्शन’ (Smart Text Actions) फीचर आणत आहे. या सुविधेमुळे चॅटमध्ये आलेले फोन नंबर, तारीख, वेळ, ई-मेल आयडी आणि पत्ते यांच्याशी संबंधित कामे थेट WhatsApp मधूनच करता येणार आहेत. त्यामुळे वारंवार वेगवेगळे अॅप उघडण्याची गरज कमी होणार आहे. हे फीचर Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले जात आहे.
काय आहे WhatsApp चे स्मार्ट टेक्स्ट ॲक्शन फीचर ?
WABetaInfo च्या अहवालानुसार, WhatsApp ने या नव्या फीचरचे मर्यादित वापरकर्त्यांसाठी रोलआउट सुरू केले आहे. सध्या Android आणि iOS वरील काही निवडक वापरकर्त्यांना ॲपच्या नवीन आवृत्तीमध्ये ही सुविधा मिळत आहे. टप्प्याटप्प्याने हे फीचर सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवले जाण्याची शक्यता आहे. या फीचरच्या माध्यमातून WhatsApp चॅटमधील महत्त्वाची माहिती आपोआप ओळखणार आहे. यामध्ये फोन नंबर, तारीख, वेळ, ई-मेल आयडी आणि पत्त्यांचा समावेश आहे. अशी माहिती ओळखल्यानंतर संबंधित मजकुराखाली ठिपक्यांची रेषा दिसेल. त्या मजकुरावर टॅप केल्यास किंवा काही वेळ दाबून ठेवल्यास पर्यायांचे पॉप-अप मेन्यू उघडेल.
फोन नंबरवरून थेट कॉल, कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह करण्याची सुविधा - WhatsApp चॅटमध्ये एखाद्याने फोन नंबर पाठवल्यास तो नंबर कॉपी करणे, कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह करणे किंवा थेट कॉल करणे असे पर्याय उपलब्ध होतील. त्यामुळे नंबर कॉपी करून वेगळ्या अॅपमध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही.
ISRO ने अंतराळात काय पाठवले? भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO ने 30 ऑक्टोबर 2026 रोजी GSLV-F18 रॉकेटच्या मदतीने NVS-03 हा नेव्हिगेशन उपग्रह अंतराळात प्रक्षेपित ...
तारीख आणि वेळ थेट कॅलेंडरमध्ये जोडता येणार - चॅटमध्ये एखाद्या कार्यक्रमाची तारीख किंवा वेळ दिली असल्यास ती थेट मोबाईलच्या कॅलेंडरमध्ये जोडता येईल. तसेच नवीन इव्हेंट तयार करण्याचाही पर्याय मिळू शकतो. त्यामुळे महत्त्वाच्या भेटी, कार्यक्रम आणि वेळापत्रक लक्षात ठेवणे सोपे होणार आहे.एखाद्याने WhatsApp वर पत्ता पाठवल्यास त्यावर टॅप करून थेट मॅप अॅपमध्ये लोकेशन उघडता येईल. त्याचप्रमाणे, चॅटमध्ये ई-मेल आयडी आल्यास डिफॉल्ट ई-मेल अॅपच्या माध्यमातून थेट मेल पाठवण्याचा पर्याय मिळणार आहे.
जुन्या सुविधांचा वापर आता अधिक सोप्या पद्धतीने - यातील काही सुविधा WhatsApp वर यापूर्वीपासून उपलब्ध आहेत. मात्र, नव्या स्मार्ट टेक्स्ट अॅक्शन फीचरमुळे हे सर्व पर्याय एकाच ठिकाणी आणि अधिक सोप्या पद्धतीने वापरता येणार आहेत. हे फीचर पाठवलेल्या तसेच प्राप्त झालेल्या मेसेजमधील संबंधित माहितीवर काम करणार आहे. ज्या वापरकर्त्यांना या शॉर्टकटचा वापर करायचा नाही, त्यांना नेहमीप्रमाणे मेसेज वाचता आणि पाठवता येतील. तसेच, या सुविधेचा अनुभव सुधारण्यासाठी WhatsApp वापरकर्त्यांकडून फीडबॅकही घेऊ शकते.
सर्व वापरकर्त्यांना कधी मिळणार फीचर ?
सध्या हे फीचर मर्यादित वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होत असल्याची माहिती आहे. WhatsApp कडून अद्याप या फीचरच्या जागतिक लॉन्चची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व Android आणि iOS वापरकर्त्यांना ही सुविधा नेमकी कधी मिळणार, याबाबत स्पष्टता नाही.