९५ टक्के शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जाहीर केलेली पाच हजार रुपयांची अग्रिम मदत येत्या दोन दिवसांत राज्यातील ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होईल. आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत ही रक्कम जमा झाली असून, उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मदत मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत आज पुन्हा चार लाख ८६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांत चार हजार ७६४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे २१ लाख शेतकऱ्यांना १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती दिली. ते म्हणाले, “राज्य शासनाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रिम मदत म्हणून पाच हजार रुपये देण्याचे आपण घोषित केले होते. त्यानुसार आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोहोचले आहेत आणि पुढील दोन दिवसांत जवळपास ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोहोचतील. पाच टक्के शेतकरी थोडे मागे-पुढे होतात, कारण त्यांच्या खात्यांमध्ये काही अडचणी असतात. मात्र, आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत पैसे जमा झाले असून, पुढील दोन दिवसांत बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यांत ही रक्कम जमा होईल.


त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत आज पुन्हा चार लाख ८६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये चार हजार ७६४ कोटी रुपये जमा केले आहेत. आज जमा करण्यात आलेल्या रकमेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक वाटा आहे. मराठवाड्यातील जवळपास दोन लाख ७६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीचे पैसे राज्य सरकारच्या वतीने जमा करण्यात आले आहेत. एकूण विचार केला, तर आतापर्यंत जवळपास २१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली असून, त्यासाठी सुमारे १९ हजार कोटी रुपये दिले आहेत. अजूनही याद्यांचे प्रमाणीकरण सुरू आहे. जसजसे प्रमाणीकरण होत जाईल, तसतसे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्याची कार्यवाही सुरू राहील.



महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि या योजनांचे प्रत्यक्ष पैसेदेखील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होत आहेत. दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला आहे. हा माझा एकट्याचा आदेश नाही. सर्व मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी केली पाहिजे, असे सर्वांचे मत आहे. त्यामुळे आमच्या सर्वांचा प्रयत्न असेल की, दिवाळीच्या निमित्ताने कोणाच्या तरी घरी, शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करावी.


मराठवाड्यातील पाणी वाटपावरून चिरोधकांनी केलेल्या टिकेबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, इतकी वर्षे मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू होते. मात्र, महायुतीच्या सरकारनेच मराठवाड्याच्या हक्काचे सात टीएमसी पाणी मराठवाड्याला दिले. त्याचे काम आता पूर्णत्वापर्यंत नेले आहे. लवकरच हे काम पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्याला हे पाणी मिळेल. त्याचा सर्वाधिक फायदा धाराशिव आणि बीड जिल्ह्यांना होणार आहे.



राहुल गांधी आणि विरोधकांवर हल्लाबोल


दरम्यान, सत्ताधारी पक्ष राजकीय मोर्चे काढून लोकशाही वाचवण्यासाठी मागणी करत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, “आमचे मोर्चे कशासाठी आहेत, हे समजून घेतले तर कदाचित अशा पद्धतीने ते बोलणार नाहीत. हे मोर्चे अराजकतेच्या विरोधातले आहेत. संविधान वाचवण्यासाठी हे मोर्चे आहेत. ज्या प्रकारे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडी या देशामध्ये व्यवस्था परिवर्तन (रेजिम चेंज) करण्याचा प्रयत्न करते आहे, त्या रेजिम चेंजचा अर्थ संविधान बदलणे हाच असतो. त्यामुळे रेजिम चेंज करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तेच रस्त्यावर येऊ शकत नाहीत, तर आम्हीही रस्त्यावर उतरून याचा मुकाबला करू शकतो. ते जेवढे लोक घेऊन रस्त्यावर येतात, त्यापेक्षा जास्त लोकांचे समर्थन भारतीय संविधानाला, भारतीय लोकशाहीला आणि अराजकतेच्या विरोधात आहे. म्हणून आमचे हे मोर्चे सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मंत्रिमंडळाचे १२ मोठे निर्णय; विद्यार्थी, वाहनधारक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित १२ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले

महाराष्ट्राच्या आरोग्यसेवेला 1440 डॉक्टरांचे बळ; गुणवत्तापूर्ण सेवेसाठी डॉक्टरांनी विश्वास संपादन करावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक आहे. एकाच वेळी 1440 नवनियुक्त

'गोकुळ'वर महायुतीच्या सत्तेचा मार्ग मोकळा, शासकीय सदस्यांच्या नियुक्तीवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

मुंबई: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या सत्तासंघर्षात महायुती सरकारने महत्त्वाचा

Chief Minister Relief Fund : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अतुल सावे यांच्या मुलाचा विवाह साधेपणाने; मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटींची मदत

Maharashtra News: महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई आणि पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी व

Pune Police : थेट पोलीस आयुक्तांचे निवासस्थान गाठले अन्...; पोलीस कर्मचाऱ्यानेच घातला गोंधळ, नेमकं काय घडलं?

पुणे: पुणे पोलीस दलात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदली न मिळाल्याच्या नाराजीतून आणि वरिष्ठांच्या

Maharashtra Government : आदिवासी बांधवांसाठी सरकारची विशेष मोहीम; आधार कार्ड आणि जन्म दाखले मिळवून देणार

Maharashtra News: आधार कार्ड आणि जन्म दाखला यांसारखी आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे अनेक आदिवासी नागरिक शासकीय योजनांच्या