Shamaldas Gandhi Marg : शामलदास गांधी मार्ग उड्डाणपुलाखालील परिसर सुशोभित, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते लोकार्पण

या लोकार्पण सोहळ्यास सी व डी प्रभाग समिती अध्यक्ष आकाश पुरोहित, स्थानिक नगरसेविका रिटा मकवाना, उप आयुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव तसेच सहायक आयुक्त (सी विभाग) सुनील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेकडून 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपुलाखालील परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या परिसरात सुरक्षित पादचारी मार्ग, उद्यान, वृक्षारोपण आणि आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले आहे. या विकसित परिसराचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष तथा स्थानिक आमदार राहुल नार्वेकर यांच्या हस्ते मंगळवारी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी लोकार्पण करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या लोकार्पण सोहळ्यास सी व डी प्रभाग समिती अध्यक्ष आकाश पुरोहित, स्थानिक नगरसेविका रिटा मकवाना, उप आयुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव तसेच सहायक आयुक्त (सी विभाग) सुनील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.


शामलदास गांधी मार्ग ( प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपुलाखालील ई रोड व एच रोड परिसरात यापूर्वी पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पदपथ उपलब्ध नव्हता. विशेषतः एच रोडची रुंदी अवघी ४ मीटर असल्याने उड्डाणपुलाखालील सार्वजनिक शौचालय, महानगरपालिका बँक आणि घनकचरा व्यवस्थापन चौकी यांसारख्या संरचनांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत होते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्यासह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता. ही समस्या दूर करण्यासाठी महानगरपालिकेने उड्डाणपुलाखालील अडथळा ठरणाऱ्या संरचनांचे पर्यायी ठिकाणी स्थलांतर करून परिसर मोकळा केला. त्यानंतर उपलब्ध जागेचा नियोजनबद्ध वापर करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग विकसित करण्यासोबतच उद्याननिर्मिती व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले.
या प्रकल्पांतर्गत ई रोडवर सुमारे १५० मीटर लांबीचा नवीन पदपथ बांधण्यात आला आहे. तसेच एच रोडवर सुमारे १०० मीटर लांबीचे वळणदार पादचारी मार्ग विकसित करण्यात आले आहेत. ई रोडलगतच्या भिंतीवर सुमारे ४०० चौरस मीटर क्षेत्रफळात आकर्षक त्रिमितीय (३डी) भित्तिचित्र साकारण्यात आले आहे. त्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडली आहे.



प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलाखालील परिसराच्या विकासकामांदरम्यान स्थानिक नागरिकांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. महानगरपालिकेने या सूचनांचा सकारात्मक विचार करून त्यांचा प्रकल्पात समावेश केला. लोकार्पण सोहळ्यादरम्यान स्थानिक नागरिकांनी राहुल नार्वेकर, लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी प्रकल्पाच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीबद्दल आणि परिसराच्या झालेल्या कायापालटाबद्दल समाधान व्यक्त केले.


उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत आकर्षक उद्यान विकसित करून वृक्षारोपण आणि लँडस्केपिंग करण्यात आले आहे. या ठिकाणी सूर्यप्रकाश कमी असतानाही चांगल्या प्रकारे वाढू शकणाऱ्या वनस्पतींची निवड करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण २५० मीटर लांबीच्या परिसरात आकर्षक सजावटीचे विद्युत खांब बसविण्यात आले आहेत. उद्यानाची देखभाल आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सुमारे ४५ चौरस मीटर क्षेत्रफळाची बहुउद्देशीय संरचना उभारण्यात आली आहे. तिचा उपयोग केअरटेकर कक्ष, साठवणूक कक्ष आणि सुरक्षा चौकी म्हणून करण्यात येणार आहे. याशिवाय, उद्यानातील वनस्पतींचे योग्य संवर्धन व्हावे यासाठी संपूर्ण हरित क्षेत्रात स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीही कार्यान्वित करण्यात आली आहे.


या प्रकल्पामुळे शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपुलाखालील पूर्वी दुर्लक्षित आणि वाहतुकीस अडथळा ठरणारा परिसर आता सुरक्षित, सुशोभित आणि हरित सार्वजनिक जागेत रूपांतरित झाला आहे. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे ये-जा करण्यासाठी सुविधा उपलब्ध होण्यासोबतच नागरिकांना विरंगुळ्यासाठी एक आकर्षक जागाही उपलब्ध झाली आहे.

Comments
Add Comment

BMC News : कचरा वेचकांनाही हातभार, महापालिकेच्यावतीने पाच ठिकाणी नोंदणीकृत संस्थेची निवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) देवनार डम्पिंग ग्राउंडसह चार कचरा हस्तांतरण केंद्रांसाठी आता नोंदणीकृत कचरा वेचक

Mumbai road development : मुंबईतील उर्वरीत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण, शेवटचा हात फिरवण्यासाठी लवकरच निविदा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी पहिल्या दोन टप्प्यांमध्ये रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण

BMC : महापालिका मुख्यालयासह फोर्ट हेरिटेज परिसरातील पदपथांची होणार सुधारणा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या फोर्ट हेरिटेज परिसराचा कायापालट आता वेगळ्या पध्दतीने केला जाणार

Western Railway: पश्चिम रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांसाठी ‘ऑपरेशन डीप’, ऐन सणासुदीच्या काळात केली लाखोंची वसुली

मुंबई: प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही दररोज रेल्वेने प्रवास करतायत तर ही बातमी

मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार: लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेचे मोठे पाऊल, 32 नव्या गाड्यांचे नियोजन

पश्चिम रेल्वेने मुंबईतील वाढती प्रवासी गर्दी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील वेटिंग लिस्टची समस्या दूर

Sanjay Shirsat On Dia Mirza : "दिया मिर्झाने आधी भोंग्यांवर बोलून दाखवावे आणि मग...दिया मिर्झाच्या व्हिडिओवर मंत्री संजय शिरसाट आक्रमक; 'हिंदूंच्याच सणांवर निर्बंध का?' असा थेट सवाल

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पर्यावरणाचे रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणासाठी अभिनेत्री