Ayushmann Khurrana: बॉलिवूडमधील कलाकारांना धमकावण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. टायगर श्रॉफ नंतर आता आणखी एका अभिनेत्याचे नाव समोर आले आहे. बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला धमकीचा ऑडिओ मेसेज पाठवण्यात आल्याची माहिती समोर आहे. यामध्ये पाठवणाऱ्याने स्वतःची ओळख लॉरेन्स गँगचा सदस्य म्हणून करून दिली आहे. संदेशाद्वारे स्वतःचा संबंध लॉरेन्स गँगशी असल्याचा दावा करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने अभिनेत्याकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत ऑडिओ क्लिपच्या आधारे तपास सुरू केला आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष्मान खुरानाला आलेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये, एका व्यक्तीने आपण लॉरेन्स गँगशी संबंधित असल्याचे सांगून आयुष्मानकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केली आहे. पोलीस आता या ऑडिओ क्लिपची चौकशी करत असून प्राथमिक तपासात संदेश पाठवणाऱ्याची ओळख आणि त्याच्या दाव्यांची तपासणी केली जात आहे. या घटनेमुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धमकी देणारी व्यक्ती नेमकी कोण आहे आणि तिचा कुख्यात लॉरेन्स गँगशी खरोखरच संबंध आहे का की फक्त गँगचे नाव वापरून धमकी देण्यात आली आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
नेमका हा संदेश कोणी पाठवला, त्यामागचा उद्देश काय होता आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीचे गुन्हेगारी जगताशी काही संबंध आहे का, या सर्व बाबींचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. ऑडिओमध्ये स्वतःची ओळख सांगणाऱ्या व्यक्तीच्या आवाजाची, पोलीस रेकॉर्डमध्ये उपलब्ध असलेल्या आरोपीच्या ऑडिओशी जुळवणी केली जात आहे. धमकी देणारी व्यक्ती खरोखरच एखाद्या गुन्हेगारी टोळीशी संबंधित आहे की कोणीतरी अभिनेत्याला घाबरवण्यासाठी त्या टोळीच्या नावाचा वापर करत आहे, याचा देखील शोध सुरु आहे.
Adinath Kothare Ramayana Movie: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांचा बहुचर्चित चित्रपट 'रामायण' (Ramayana Movie) हा प्रदर्शित होण्यासाठी आता काहीच दिवस ...
अभिनेता तुषार कपूरलाही मिळाला होता धमकीचा संदेश
याआधी काही दिवसांपूर्वी अभिनेता तुषार कपूरला असाच एक धमकीचा ऑडिओ मेसेज मिळाला होता. त्या प्रकरणात, संदेश पाठवणाऱ्याने स्वतःची ओळख हॅरी बॉक्सर म्हणून करून दिली होती. परंतु, पोलिसांच्या प्राथमिक तपासात तो ऑडिओ बनावट असल्याचा सांगण्यात आले होते. तसेच यापूर्वी टायगर श्रॉफवरही हल्ला झाला होता, ज्याची जबाबदारी लॉरेन्स गँगने स्वीकारली होती. आतापर्यंत तेरा संशयितांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. याव्यतिरिक्त, अमिताभ बच्चन आणि दिलजीत दोसांझ यांना देखील ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या, ज्यामुळे अमिताभ बच्चन यांची सुरक्षा वाढवण्यात आली.
सध्या, मुंबई पोलीस या दोन्ही प्रकरणांचा तपास करत असून, चित्रपटसृष्टीत प्रमुख काम करणाऱ्या कलाकारांना धमक्या देणाऱ्या आणि भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती किंवा टोळ्यांना ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. या घटनांमागे कोणती एखादी संघटित टोळी आहे का, किंवा अशा कारवाया करण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावांचा वापर करत आहेत का, याचाही पोलीस तपास करत आहेत. आयुष्मान खुरानाला मिळालेल्या धमकीचा तपास सुरू असून, अद्याप कोणतीही एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही.