Wednesday, November 4, 2026

Nalasopara Crime : भटक्या कुत्र्याला लाथ मारल्याच्या वादातून नालासोपाऱ्यात राडा; 30 ते 35 घरांवर जमावाचा हल्ला

नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना, भटक्या कुत्र्याला लाथ मारल्यावरून वाद, जमावाचा चाळीतील घरांवर हल्ला

Nalasopara Crime News: भटक्या कुत्र्याला लाथ मारल्याच्या आरोपातून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. नालासोपारा पूर्वेतील श्रीराम नगर परिसरातील 8 ते 9 चाळींमधील 30 ते 35 घरांवर सोमवारी रात्री 50 ते 60 जणांच्या जमावाने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी 40 हून अधिक जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

लोखंडी सळ्या, काठ्या आणि दगडांनी हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास 50 ते 60 जणांचा जमाव श्रीराम नगर परिसरात दाखल झाला. जमावाच्या हातात लोखंडी सळ्या, काठ्या आणि दगड होते. त्यांनी परिसरातील घरांच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. तसेच वीज मीटर बॉक्स आणि दुचाकींचेही नुकसान केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली.

कुत्र्याला लाथ मारल्याच्या आरोपातून वाद

पोलीस उपायुक्त (झोन 3) शशिकांत बोराटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री संतोष भुवन परिसरातील रहिवासी रितेश दुबे श्रीराम नगरमधून जात होता. त्यावेळी त्याने एका भटक्या कुत्र्याला लाथ मारल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर परिसरातील 5 ते 6 रहिवाशांनी त्याला जाब विचारत मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. याच घटनेचा बदला घेण्यासाठी सोमवारी रात्री जमावाने हल्ला केल्याचा प्राथमिक तपासात संशय आहे.

40 हून अधिक जणांविरुद्ध गुन्हे दाखल

या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी राजवीर सरदार, रणवीर सरदार, निलेश गुप्ता यांच्यासह 40 हून अधिक जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दंगल, गुन्हेगारी धमकी, बेकायदेशीर जमाव, अतिक्रमण, मारहाण आणि मालमत्तेचे नुकसान यांसारख्या आरोपांखाली कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >