
Nashik News : मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या बेजबाबदार चालकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. शहर पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेमुळे मद्यपी वाहनचालकांवरील कारवाईत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत २०२६ मधील पहिल्या दहा महिन्यांत ड्रंक अँड ड्राइव्हच्या प्रकरणांमध्ये तब्बल २३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १०१ कारवाया करण्यात आल्या होत्या. तर यंदा याच कालावधीत तब्बल ३३६ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सात महत्त्वाच्या अपघातप्रवण मार्गांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
नाशिकमधील ७ क्रिटिकल कॉरिडॉरवर पोलिसांची नजर
पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या आदेशानुसार राज्यभरात रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत नाशिक शहरातही वाहतूक पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त चंद्रकांत गवळी आणि शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांच्या देखरेखीखाली सात संवेदनशील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत क्रिटिकल कॉरिडॉर पथके तैनात करण्यात आली आहेत.ही पथके शहरातील मुख्य रस्ते, महामार्ग आणि अपघातप्रवण ठिकाणी नियमित गस्त घालत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर तातडीने कारवाई केली जात आहे. विशेषतः मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात आली आहे.
Nashik Crime : जुन्या सिडकोतील तुळजाभवानी चौक परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने कोयत्याने एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला ...
ऑक्टोबरमध्ये एकाच महिन्यात १,६१५ कारवाया
नाशिक शहर वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार, १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या एका महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात एकूण १ हजार ६१५ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये विनाहेल्मेट वाहन चालवणे, ट्रिपल सीट प्रवास, रॉन्ग साइड ड्रायव्हिंग आणि मद्यप्राशन करून वाहन चालवणे अशा प्रकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ऑक्टोबर महिन्यातच १२६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांचा वचक वाढल्याचे दिसून येत आहे.
ड्रंक अँड ड्राइव्ह कारवाईची आकडेवारी काय सांगते ?
नाशिक शहर पोलिसांच्या कारवाईतील वाढ पुढील आकडेवारीवरून स्पष्ट होते.
- २०२५ मधील एकूण कारवाया : ११५
- १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२५ : १०१ केसेस
- १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२६ : ३३६ केसेस
- कारवाईतील वाढ : २३५ केसेस
- टक्केवारीतील वाढ : २३३ टक्के
- केवळ ऑक्टोबर २०२६ मधील कारवाई : १२६ केसेस
वाहतूक नियम पाळण्याचे पोलिसांचे आवाहन
मद्यप्राशन करून वाहन चालवणे हे केवळ स्वतःच्या नव्हे, तर रस्त्यावरील इतर नागरिकांच्याही जीवाला धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त चंद्रकांत गवळी आणि सहायक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांनी केले आहे. शहरातील अपघातांमधील जीवितहानी कमी करणे हे पोलिसांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी क्रिटिकल कॉरिडॉरवरील गस्त आणि विशेष तपासणी मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून, नियमभंग करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.






