
Nashik Crime : आरटीओ चलनाच्या नावाने मोबाईलवर पाठविण्यात आलेली एपीके फाईल उघडणे एका हॉटेल व्यावसायिकाला महागात पडले आहे. सायबर भामट्यांनी मोबाईलमध्ये पाठविलेल्या फाईलच्या माध्यमातून त्यांच्या एचडीएफसी बँकेतील दोन खात्यांवर डल्ला मारत तब्बल ४ लाख ४५ हजार ३२९ रुपये परस्पर काढून घेतले. टागोरनगर परिसरात ही घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरुषोत्तम नारायण शेट्टी (४९, रा. टागोरनगर, नाशिक) असे फसवणूक झालेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. २ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून 'आरटीओ चलन' या नावाने एपीके फाईल पाठविण्यात आली होती. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आलेली फाईल असल्याचे समजून शेट्टी यांनी ती उघडली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यांमधून अनधिकृत व्यवहार झाल्याचे समोर आले.
दोन बँक खात्यांतून लाखोंची रक्कम गायब
शेट्टी यांच्या एचडीएफसी बँकेतील पहिल्या खात्यातून ६८ हजार ९०१ रुपये, ७५ हजार ४८० रुपये आणि ९८ हजार रुपये, असे एकूण २ लाख ४२ हजार ३८१ रुपये परस्पर काढण्यात आले.तर दुसऱ्या खात्यातून ६० हजार ४५५ रुपये, ६२ हजार ४९३ रुपये आणि ८० हजार रुपये, असे एकूण २ लाख २ हजार ९४८ रुपये अनोळखी खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले.अशा प्रकारे दोन्ही खात्यांमधून एकूण ४ लाख ४५ हजार ३२९ रुपये लंपास करण्यात आले. मोबाईलवर आलेल्या फाईलमुळे बँक खात्यांतील रक्कम परस्पर वळती झाल्याने शेट्टी यांना आर्थिक फटका बसला.
Nashik : नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. शासनाकडून मिळणाऱ्या ...
सायबर पोलिसांकडे तक्रार
बँक खात्यांमधून रक्कम परस्पर काढण्यात आल्याचे लक्षात येताच शेट्टी यांनी गंगापूर रोड येथील सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाइन तक्रार दाखल केली. त्यानंतर ही तक्रार पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे करीत आहेत.
आरटीओ चलनाच्या नावाने येणाऱ्या एपीके फाईलपासून सावध राहा
आरटीओ चलन, बँक व्यवहार किंवा शासकीय सेवांच्या नावाने मोबाईलवर पाठविण्यात येणाऱ्या अनोळखी एपीके फाईल डाउनलोड करू नयेत. अशा फाईलच्या माध्यमातून मोबाईलमधील माहिती आणि बँक खात्यांशी संबंधित तपशील सायबर भामट्यांच्या हाती लागण्याची शक्यता असते.त्यामुळे अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंक किंवा फाईल उघडण्यापूर्वी तिची खातरजमा करावी, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.






